Sharad Pawar Jayant Patil : शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेताच जयंत पाटलांचं पहिलं ट्विट, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 06:39 PM2023-05-05T18:39:55+5:302023-05-05T18:40:21+5:30
जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा होती.
Sharad Pawar, Jayant Patil Tweet: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या विषयावर आज पडदा पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा आणि निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. 2 मे रोजी शरद पवारांनीराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचे जाहीर केले होते. लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केला होता. पण त्यांच्या निर्णयानंतर पक्षातून हा निर्णय मागे घेण्यासाठी आग्रह करण्यात आला. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पक्षातील नेतेमंडळींनी केलेल्या आग्रहामुळे अखेर शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला. या घोषणेनंतर लगेचच जयंत पाटील यांनी एक ट्वीट केले.
'लोक माझे सांगाती' हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आग्रहाचा मान राखून मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे असे पवार म्हणाले. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा होती. त्यामुळे पवारांनी निर्णय मागे घेताच, जयंत पाटील यांच्याकडून ट्वीट करण्यात आले. "आदरणीय शरद पवारसाहेब यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला असून राज्यभरातील कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांनी हा आनंद गावोगावी व प्रत्येक चौकाचौकात साखर वाटून साजरा करावा असे आवाहन मी करत आहे", असे ट्वीट त्यांनी केले.
आदरणीय शरद पवारसाहेब यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला असून राज्यभरातील कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांनी हा आनंद गावोगावी व प्रत्येक चौकाचौकात साखर वाटून साजरा करावा असे आवाहन मी करत आहे. @NCPspeaks
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 5, 2023
दरम्यान, एका पत्रकाच्या माध्यमातून पवार म्हणाले की, मी पुनश्चः अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसांपर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील.