पवारांच्या खेळीने पक्षांतर, युतीच्या चर्चांना 'ब्रेक'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 01:08 PM2019-09-28T13:08:09+5:302019-09-28T13:10:42+5:30
राजकीय वर्तुळात पवार यांचा दबदबा यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. ईडीची घटना आणि अजित पवारांचा राजीनामा ही पवारांचीच खेळी असून त्यांच्या खेळीमुळे युती आणि पक्षांतराचे मुद्दे मागे पडल्याची सध्याची स्थिती आहे.
मुंबई - विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे युती आणि आघाडीची बोलणी सुरू आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेला विरोधी पक्षाला फारशी संधी नसल्याचे गृहीत धरून सत्ताधारी भाजप-शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले आहे. त्यामुळे सगळीकडे पक्षांतर आणि युतीची लांबलेली बोलणीच चर्चेत होती. परंतु, गेल्या दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी घेतलेल्या स्टँडमुळे राजकारण ढवळून निघाले असून युतीचा वाद आणि पक्षांतराच्या चर्चांना ब्रेक लागला आहे.
निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासूनच राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. विरोधी पक्षातील 30 हून अधिक नेते भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष गळीगात्र झाला होता. त्याला उभारी देण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेत महाराष्ट्र दौरा काढला. मात्र शिखर बँकेत झालेल्या कथित घोटाळ्यावरून ईडीने पवारांवर नाव नसताना गुन्हा दाखल केल्याने राष्ट्रवादीला आयतेच कोलीत मिळाले. त्याचा फायदा घेणार नाही ते पवार कसले. त्यानुसार पवारांनी 27 सप्टेंबर रोजी स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर होणार असल्याची घोषणा केली होती.
शरद पवार यांनी घोषणा केल्याप्रमाणे शुक्रवारी मुंबई गाठली. त्यामुळे माध्यमांवर सकाळपासूनच शरद पवार आणि ईडीचे कार्यालय चर्चेत आले होते. दिवसभर सोशल मीडियावर देखील पवारांशिवाय काहीही दिसत नव्हते. मागील 5-6 दिवसांपासून युतीच्या चर्चांनी माध्यमं व्यापून गेले असताना शुक्रवारचा दिवस पवारांना व्यापून टाकला. त्यापाठोपाठ सांयकाळी अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे पुन्हा राजकारण ढवळून निघाले.
राजकीय वर्तुळात पवार यांचा दबदबा यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. ईडीची घटना आणि अजित पवारांचा राजीनामा ही पवारांचीच खेळी असून त्यांच्या खेळीमुळे युती आणि पक्षांतराचे मुद्दे मागे पडल्याची सध्याची स्थिती आहे.