मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांना मोठ्या प्रमाणात गळती लागली. सर्वच विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे. 2014 पासून राष्ट्रवादी काँग्रेसमधून 30 हून अधिक नेत्यांनी सत्तेसाठी पलायन. त्यामुळे राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीत आव्हानही देऊन शकणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु, शरद पवारांनी अचानक गिअर बदलल्याने सत्ताधाऱ्यांसह पक्षातून गेलेल्या गयारामांची चिंता वाढली आहे.
दिग्गज नेत्यांनी पलायन केल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष कमकुवत झाला होता. तसेच पक्षातील नेत्यांमध्ये उत्साह दिसत नव्हता. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेनंतरही राष्ट्रवादी निवडणुकीसाठी सज्ज झाला असं चित्र नव्हतं. हे चित्र बदलण्यासाठी अखेर पवारच बाहेर पडले.
याच महिन्यापासून पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला. त्यात त्यांच्या सभांना होणारी गर्दी लक्षवेधी होती. तर साताऱ्यात पवारांनी छत्रपती उदयनराजे यांच्याविरुद्ध केलेले शक्तीप्रदर्शन चर्चेचा विषय ठरले होते. त्यामुळे राष्ट्रवादी कमबॅक करणार अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यातच पवारांना आलेली ईडीची नोटीस विरोधी पक्षासाठी संधीच म्हणावी लागेल.
ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर पवारांनी स्वत:हून ईडीच्या कार्यालयात दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ईडीसमोरच मोठा पेच निर्माण झाला होता. त्यातच विरोधकांकडून हे भाजपचे कृत्य असल्याचे सांगण्यात येत आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील पवारांना पाठिंबा दर्शविला. तर राजू शेट्टी, अण्णा हजारे आणि एकनाथ खडसे यांनी पवारांची पाठराखण केली.
एकूणच विरोधक आणि आरोप करणारे नेतेच पाठराखण करत असल्यामुळे पवारांना जनसामान्यांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे पक्षांतर करणारे नेते धास्तावले आहेत. पक्षांतर करून गेलेले निवडून येणार नाहीत, असा गर्भित ईशारा दिल्याने गयारामांचे धाबे दणाणले आहेत.