अतुल कुलकर्णी ।मुंबई : गेली ५० वर्षे सलग देशाच्या चारही सभागृहांत कार्यरत असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्याचे अभिनंदन करणारा ठराव विधानसभेत मांडला गेला. मात्र, या ठरावावरची भाषणे राष्ट्रवादी व काँग्रेसचे काही आमदार वगळता बहुतांश रिकाम्या बाकांसमोर झाली. शनिवारी येणारा हा ठराव शनिवार ते सोमवार अधिवेशनाला सुटी द्यायची म्हणून शुक्रवारी घेतला गेला. तो दुपारी २च्या सुमारास सुरू झाला. त्या वेळी सत्ताधारी बाकावर मंत्री एकनाथ शिंदे वगळता शिवसेनेचा एकही कॅबिनेट मंत्री सभागृहात नव्हता. तर काँग्रेसच्या बाकावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक सदस्यांची अनुपस्थिती होती.सत्ताधारी बाकांवर तर लक्षणीय अनुपस्थिती होती. विधानसभेत पतंगराव कदम यांचे उत्स्फूर्त भाषण झाले. कोणताही कागद हातात न धरता पतंगरावांनी अनेक धमाल किस्सेही सांगितले व पवारांच्या त्यांना वाटणा-या राजकीय चुकाही बोलून दाखवल्या. शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला हे सांगितले जात असले तरी ते चुकीचे आहे. उलट वसंतदादांनीच पवारांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा आपल्याजवळ बोलून दाखवली होती, असेही पतंगराव म्हणाले. काँग्रेस सोडण्याची मोठी चूक पवारांनी केली. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यानंतर काँग्रेसमध्ये दुसरा मोठा मास लिडर नाही. जर पवार काँग्रेसमध्येच राहिले असते तर देशाचे व राज्याचे राजकारण वेगळ्या दिशेने गेले असते, असे सांगून पतंगराव म्हणाले, पवारांनी दुसरी चूक केली ती संरक्षणमंत्री असताना ते पद सोडून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारले. एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा तेच पद घेण्याऐवजी पवार दिल्लीत राहिले असते तरी चालले असते; पण चुकीच्या सल्ल्यामुळे त्यांनी हे निर्णय घेतले, असे आपले व्यक्तिगत मत असल्याचेही पतंगराव म्हणाले.शरद पवार म्हणजे शपथ न घेतलेले जनतेचे पंतप्रधान आहेत, असे सांगून जयंत पाटील म्हणाले, धीर आणि आत्मविश्वास हे प्रचंड मोठे गुण असणाºया पवार यांनी एन्रॉनचा विषय कधीही राजकीय केला नाही. त्यांच्या काळात तांदूळ, डाळींना विक्रमी भाववाढ मिळाल्याचे सांगितले.अनेक सदस्यांनी भाषणांचे मुद्दे कागदावर लिहून आणले होते व वाचून दाखवत भाषण केले. विधानपरिषदेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नारायण राणे यांची भाषणे अतिशय उत्स्फूर्त होती. कोणताही आडपडदा किंवा कोणतेही राजकीय अभिनिवेश न आणता आपल्याला अत्यंत आवडणारे नेते शरद पवार आहेत, असे राणे यांनी सांगून टाकले.सगळ्यात प्रभावी भाषण तटकरे यांचे होते. कोणताही कागद हातात न धरता, कोठेही न अडखळता ओघवत्या शैलीत त्यांनी पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा मोठा पट सभागृहात उभा केला. तर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना पवार यांनी आनंद दिघे अडचणीत असताना ते कोणत्या पक्षाचे नेते आहेत हे नपाहता दिघेंना मदत केली होती. पवारांना वेगळून राज्याचे राजकारण नोंदले जाऊच शकत नाही, असेही ते म्हणाले.
शरद पवारांच्या अभिनंदनाच्या ठरावाकडे आमदारांनी फिरवली पाठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 1:50 AM