येवला (जि. नाशिक): माझ्या वयाबाबत वारंवार उल्लेख होतो आहे. माझे वय ८३ आहे. परंतु माझ्या वयाकडे पाहू नका, हा गडी काय आहे, ते पाहा. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, असा इशारा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथील जाहीर सभेत दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार खोदून काढावाच, असे आव्हान त्यांनी दिले.
छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शरद पवार यांची राज्यातील पहिलीच जाहीर सभा येवल्यात झाली. यावेळी पवार म्हणाले की, आपला अंदाज कधीच चुकत नाही. परंतु, येवल्याबाबत तो चुकला. मी येथे कुणावर टीका करायला नव्हे, तर येवलेकरांची माफी मागायला आलो आहे. पुढील निवडणुकीत ही चूक सुधारू, तोंडात अंजीर, हातात खंजीर अशी माणसे बेभरवश्याची आहेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, हेमंत टकले आदी उपस्थित होते
वयानुसार थांबले पाहिजे, या अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारले असता पवार यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेतील 'ना टायर्ड हूं ना रिटायर्ड हूं... या ओळीची आठवण करून दिली. आताच्या मंत्रिमंडळात ६० ते ७० वयोगटातील लोक आहेत. १९७८ मध्ये मुख्यमंत्री होतो त्यावेळी एक व्यक्ती माझ्या नजरेसमोर होती त्यांचे नाव मोरारजी देसाई होते. ते पंतप्रधान असताना त्यांचे ८४ वय होते. केवळ वयच नाही तर प्रकृती चांगली ठेवली तर त्या प्रकृतीने चांगली कामे होतात असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
'ते' निवडून येणार नाहीतपक्ष कोणाचा हे जनताच ठरवेल. मात्र, जे म्हणतात आमचा पक्ष बेकायदा आहे, ते राष्ट्रवादीच्या नावानेच मंत्री कसे झाले? या बेकायदा पक्षाच्या नियुक्त्या तुम्ही कशा केल्या? असा सवाल करून शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांचा समाचार घेतला. त्याचबरोबर जे पक्ष सोडून गेले, ते पुन्हा निवडून येणार नाहीत, असा दावाही त्यांनी नाशकातील माध्यमांशी संवाद साधताना केला. पवार म्हणाले, कुणाला फेरविचार करायच असेल तर हरकत नाही, पण त्या चिमण्या राहिल्या नाहीत, या चिमण्यांनो... असे म्हणण्याची स्थिती नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
भर पावसात स्वागत : राज्यव्यापी दौयावर निघालेल्या शरद पवार यांचे शनिवारी भर पावसात नाशकात जंगी स्वागत झाले. एका ठिकाणी समर्थकांच्या भेटीगाठी घेताना पवार भिजलेही. त्यावेळी जितेंद्र आव्हाड कारमध्ये शेजारी बसले होते.