Sharad Pawar News: राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पावर टीकास्त्र सोडले. तर महायुतीतील नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी या अर्थसंकल्पाबाबत भाष्य करताना आगामी विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना एक गणित मांडले आणि त्यानुसार, इथे सत्ता बदलणारच, असा मोठा दावा केला.
पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा दाखला दिला. लोकसभा निवडणूक झाली, त्या निवडणुकीत २८८ पैकी १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला आहे. त्या ठिकाणी आमचे उमेदवार पुढे आहेत. याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने एक इशारा दिला आहे. यात आमचे बहुमतच आहे. अशी स्थिती विधानसभेत झाली, तर इथे सत्ता बदलणारच आहे. त्यासाठी अनुकूल अशी स्थिती आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
लोकसभेचा धसका, भाषेचा फुलोरा असलेला अर्थसंकल्प
लोकसभेत ४८ पैकी ३१ जागा आम्हाला मिळाल्या. सांगलीत विशाल पाटील यांनी आम्हाला पाठिंबा दिला. ४८ पैकी ३१ जागा ज्या विचाराच्या निवडून येतात, त्यातून लोकांचा कल काय आहे हे स्पष्ट होते. त्यातून जो धसका घेतला, त्यामुळे हा भाषेचा फुलोरा असलेला अर्थसंकल्प मांडला. एखाद्या गोष्टीवर १०० रुपये खर्च करणार आणि खिशात ७० रुपये आहेत, तर मग १०० रुपये खर्च कसे करणार? तुमच्याकडे महसुली जमा किती आहे? महसुली खर्च किती होणार आहे? जमेपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असताना खर्चाचा फरक कसा भरणार? याची तरतूद न करता खर्च करणार म्हटले आणि विचारपूर्वक केले आहे, असे म्हणण्याला फारसा काही अर्थ राहत नाही, असे खोचक भाष्य शरद पवार यांनी केले.
दरम्यान, लोकसभेचीच स्थिती विधानसभेलाही कायम राहायला काही हरकत नाही. लोक मोदींच्या कारभारावर खूश नाहीत. मोदी पुन्हा पुन्हा सांगत होते की माझी गॅरंटी आहे. पण ती गॅरंटी काही चाललेली दिसत नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली.