सातारा - राष्ट्रवादीत आम्ही काय केले ते त्यांना माहिती नाही. पक्षाचे सहकारी अनेक गोष्ट बोलतो, वेगवेगळी मतेही असतात पण ते बाहेर जाऊन प्रसिद्ध करत नाही. हा आमच्या घरातला प्रश्न आहे. आपला पक्ष पुढे कसा जाणार हे सगळ्यांना ठाऊक आहे. नवीन नेतृत्वाची फळी कशी तयार केली जाते हे पक्षातील सर्वांना माहिती आहे असं सांगत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी सामना अग्रलेखातून झालेल्या टीकेचा समाचार घेतला.
शरद पवार म्हणाले की, १९९९ साली आम्ही पक्षाची स्थापना केली, त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे संयुक्त सरकार करायचे होते तेव्हा नव्या सरकारमध्ये पक्षातील असे अनेक सहकारी होते ज्यांच्या आयुष्यात सत्तेचा पहिलाच प्रवास होता. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आर आर पाटील. देशमुख होते अशी अनेक नावे आहेत. माझी सुरुवात राज्यमंत्री म्हणून झाली त्यानंतर प्रमोशन झाले. पण मी जी नावे घेतली त्यांची नियुक्ती कॅबिनेट मंत्री म्हणून झाली. त्या प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तत्व दाखवतो असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत आम्ही नेतृत्व तयार करतो, त्यामुळे कुणी आमच्याबद्दल लिहिले, हा त्यांचा अधिकार आहे परंतु आमच्या दृष्टीने त्याला किंमत नाही. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आम्हाला ठाऊक आहे आम्ही काय करतो त्यात आम्हाला समाधान आहे असं सांगत पवारांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्याचसोबत राजकीय पक्षांच्या धोरणामध्ये सहकारी पक्षांसोबत १०० टक्के एकमत असेल नाही. काहीगोष्टी पुढे मागे होतात, कुरघोडी होतात पण त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही असंही शरद पवारांनी स्पष्ट केले.
सामना अग्रलेखात काय म्हटलं होतं?अलीकडेच सामना संपादकीयमधून शरद पवारांवर टीका करण्यात आली होती. त्यात म्हटलं होतं की, शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले अशी टीका पवारांवर करण्यात आली होती.