Sharad Pawar: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात दंगली होताना पाहायला मिळत आहे. यावरून महाविकास आघाडीचे नेते आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशात धर्म, जातीच्या नावाने समाजात संघर्ष निर्माण केला जात आहेत. अशावेळी राजकीय व्यक्तींनी संघटित राहायला हवे. कारण या प्रवृत्तीमागे सत्ताधाऱ्यांची शक्ती आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांत किती जातीय दंगली होताहेत? हा देश, हा समाज सर्वांना घेऊन जाणारा आहे. मात्र, सध्या दहशतीचे वातावरण निर्माण करणे ही त्यांच्या कामाची पद्धत सध्या दिसून येत असल्याची टीका शरद पवार यांनी केली. आता देशातील चित्र बदलत आहे. कर्नाटकमध्ये तुम्ही पाहिलेले आहे. कोणी काहीही सांगत असले तरी आता या बदलामागे मोठी शक्ती आहे. मात्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड, हिमाचल प्रदेश अशा ७० टक्के ठिकाणी भाजप सत्तेबाहेर आहे. गोवा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये वेगळे चित्र आहे. इथे कसलीतरी खोकी देऊन फोडाफोडी केली. मात्र, आता देशाचा कारभार कोणी चालवावा, याबाबत निर्णय घेताना प्रादेशिक पक्षच हे ठरवतील, असे शरद पवार यांनी सांगितले.
आमच्या प्रश्नांकडे ढुंकूनही पाहत नाहीत, आम्ही हिंदुस्थानचे नागरिक आहोत की नाही?
मणिपूरच्या सहकाऱ्याने फोन केला, ते म्हणाले, आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही? यावर मी म्हटले की, असे टोकाचे का बोलताय? ते म्हणाले – इथे लोकांवर, अधिकारी, शैक्षणिक संस्थांवर हल्ले होताहेत. हे राज्य पेटले आहे; पण इथे कोणी लक्ष देत नाहीत. रोज घरेदारे उद्ध्वस्त होताहेत. पंतप्रधान असो की केंद्रीय मंत्री असोत, आमच्या प्रश्नांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. त्यामुळे आम्ही हिंदुस्थानचे नागरिक आहोत की नाही, अशी भीती ते व्यक्त करताहेत, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, नॉर्थ ईस्ट आणि कश्मिरी यांच्यावर लक्ष ठेवावे लागते. त्याकडे राज्यकर्ते दुर्लक्ष करतात, ही बाब खेदजनक आहे. एका बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांशी संवाद साधून तिथे शांतता राखायची असते. केंद्रीय संरक्षणमंत्री असताना हे करायचो, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे परवडणार नाही. २४ जूनला आम्ही सगळे भेटणार आहोत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही तेव्हा असतील. त्यावेळी चर्चा करू, याच विषयाला प्राधान्य राहील, असे शरद पवारांनी सांगितले.