मुंबई - राज्यात सत्तेचा गैरवापर होतोय, हे चिंताजनक आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उल्हासनगरच्या गोळीबारावर भाष्य केले आहे. शुक्रवारी रात्री उल्हासनगर येथे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार केला. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले असून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
या घटनेबाबत शरद पवार यांनी म्हटलं की, सत्तेचा गैरवापर केला जातोय हे दिसून येते. गोळीबाराची घटना व्हायला लागली आणि राज्य सरकारची त्या सगळ्याबाबतीत बघ्याची भूमिका असेल तर राज्य आज कोणत्या दिशेने चाललंय त्याचे एक उदाहरण आहे. राज्यात अशा गोष्टी घडतायेत ते महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने चिंताजनक आहे असं त्यांनी सांगितले आहे.
...उद्याच्या निवडणुकीत परिणाम दिसतील
महाविकास आघाडीतील बैठकीत चर्चा सकारात्मक झाली. प्रकाश आंबेडकर म्हणतायेत ते तथ्य आहे. आपण एकत्र येतोय पण किमान समान कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील काळात मतभेद टाळायचे असतील तर त्यावर चर्चा व्हायला हवी अशी त्यांची अपेक्षा आहे. ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीनंतर आम्ही इंडिया आघाडीत आहोत हे जाहीर केले. मागच्या निवडणुकीत काँग्रेस आणि टीएमसी एकमेकांविरोधात आक्रमक लढले. भाजपाचा पराभव करण्यासाठी जे करावे लागेल ती तयारी त्यांची आहे. नीतीश कुमारांनी एनडीएसोबत जायचाच निर्णय घेतला. इंडिया आघाडीची बैठक त्यांनीच पुढाकार घेऊन केली. त्या नीतीश कुमार यांनी आक्रमकपणे भाजपाला विरोध केला. जे घडलं ते चांगले नाही. बिहारच्या लोकांनाही ते आवडले नाही. त्याचे परिणाम उद्याच्या निवडणुकीतही दिसतील असंही शरद पवारांनी नीतीश कुमारांनी घेतलेल्या निर्णयावर म्हटलं आहे.
कुठे नेऊन ठेवणार महाराष्ट्र माझा?
दरम्यान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सरकारवर घणाघात केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभरात गुन्हागारीचे प्रमाण वाढले आहे. याबाबत मी अधिवेशनातही बोललो होतो मात्र परिस्थिती जैसे थेच दिसत आहे. पुण्यात दिवसाढवळ्या हत्या होत आहेत, कोयता गँगचा उच्छाद सुरुच आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही कधी हत्या होते तर कधी गोळीबार. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर येथे घडलेली फायरिंगची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आमदारांनीच पोलिसांसमोर गोळीबार करावा आणि तेही पोलीस स्टेशनमध्ये हे अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रात या पूर्वी असे कधी घडत नव्हते. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना नेमके कोण पाठीशी घालत आहे असा मोठा प्रश्न आज राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. साधुसंतांची भूमी म्हणून ओळख असणारे आपले महाराष्ट्र राज्य, गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखला जावू नये ही भीती आहे. कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र माझा ? असा सवाल त्यांनी विचारला आहे.