मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील शिवसेनेसोबतच्या सत्तास्थापनेतील घडामोडींवर धक्कादायक खुलासे केले होते. काँग्रेस सोबत झालेले तीव्र मतभेद, अजित पवार यांचे भाजपासोबत जाणे याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या 45 मिनिटांच्या बैठकीतील गौप्यस्फोटही त्यांनी केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपानेशरद पवारांच्या कौटुंबीक कलहांसह भ्रष्टाचारावरून टीका केली होती. मात्र, महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी चुप्पी साधली होती. यामुळे भाजपाच्या आणि राष्ट्रवादीच्या गोटात काहीतरी हालचाली होत असल्याचा संशय राजकीय वर्तुळात व्यक्त होत होता. त्यातच अजित पवार यांनी भाजपासोबत जात उपमुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ आणि शरद पवार यांनी घेतलेली मोदींची भेट सर्वांच्या भुवया उंचावणारी ठरली होती.
महाराष्ट्रात शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत सहभागी झाले आहेत. यानंतर एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी या बैठकीचा मोठा खुलासा केला आहे. एकत्र काम करण्याचा प्रस्ताव मोदींनी आपल्याला दिल्याचे पवारांनी सांगितले होते. यावर आता भाजप नेत्यांनी टीका केली आहे.
शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना भेटल्यावर 15 दिवसांनी हा खुलासा का केला हे पहिल्यांदा सांगितलं पाहिजे, अशी मागणी भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे. मोदींसोबतची भेट ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असल्याचे पवार म्हणाले होते. मी विदर्भातल्या दुष्काळी दौऱ्यावरून आलो होतो. मलाही त्यांना भेटायचं होतं त्यामुळे मी भेटलो, असे पवार म्हणाले होते. मात्र, मोदींनी त्यांना असा कुठलाही प्रस्ताव दिला नव्हता, गैरसमज निर्माण करण्यासाठी खोटे बोलत असल्याचा आरोप भांडारी यांनी केला.