Sharad Pawar News: देशाचे प्रधानमंत्री याठिकाणी येऊन गेले. हल्ली त्यांना महाराष्ट्रामध्ये जाण्याशिवाय त्यांना दुसरे काही दिसत नाही. चांगली गोष्ट आहे आम्ही तुमचे स्वागत करतो. पण इथे आल्यानंतर त्यांनी काही गोष्टी बोलून दाखवल्या. ज्यावेळी संधी मिळेल, त्यावेळेला महाराष्ट्राचा हिसका हा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही आम्हा लोकांची तयारी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केली.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार छत्रपती शाहू यांच्या प्रचारार्थ शिवशाहू निर्धार सभेत शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. देशाचे प्रधानमंत्री एखाद्या राज्यात जात असतील तर जनतेला संबोधित करतात. आम्ही लोकांनी एका काळामध्ये हे पाहिलेले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू राज्यामध्ये जात असत. नेहरू आल्यानंतर लोकांना या देशामध्ये उभारणी आम्ही कशी करणार, याचे मार्गदर्शन ते करायचे. इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री म्हणून अनेकवेळा राज्यामध्ये जायच्या आणि राज्यातील गरीब लोकांची गरिबी कशी घालवणार, यासंबंधीचे विचार मांडायच्या. हे काम प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी केले, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.
तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही
आजचे प्रधानमंत्री देशात हिंडतात. महाराष्ट्रामध्ये येतात. त्यांना दोन लोकांची आठवण प्रकर्षाने होते. एक उद्धव ठाकरे आणि दुसरे शरद पवार. त्यांना आमच्यावर टिकाटिप्पणी केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसवत नाही. मोदी साहेब, तुम्ही महाराष्ट्रात कितीदाही आलात, महाराष्ट्रात टिकाटिप्पणी कितीदाही केली, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे तुम्ही दुर्लक्ष केले तर हा महाराष्ट्र बोलेल नाही. पण ज्यावेळी संधी मिळेल, त्यावेळेला महाराष्ट्राचा हिसका हा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही आम्हा लोकांची तयारी आहे, या शब्दांत शरद पवार यांनी टीकास्त्र सोडले.