बारामती - Sharad Pawar on OBC and Marathi Reservation ( Marathi News ) राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद निर्माण झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे तर ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका यासाठी जालन्यात लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. राज्यातील या दोन्ही आंदोलनावरून शरद पवारांनीकेंद्र सरकारला सुनावलं आहे. बारामती दौऱ्यावर असणाऱ्या पवारांनी राज्य आणि केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.
शरद पवार म्हणाले की, मराठा आणि ओबीसी समाजातील लोकांच्या ज्या मागण्या आहेत, त्यासंबंधी मार्ग काढायला केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. राज्य आणि केंद्र सरकारने एका मर्यादेबाहेर आंदोलन जाणार नाही, याची काळजी घ्यावी. सामाजिक तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबादारी आहे. आम्ही इथे राजकारण आणू इच्छित नाही. पण इथे केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच केंद्र सरकारने दोनही बाजूच्या प्रश्नात लक्ष घालून तोडगा काढायला हवा. या सगळ्याचं सोल्यूशन एकच आहे. ते म्हणजे केंद्र सरकारने याचा खुलासा घेतला पाहिजे. काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल. काही ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धोरणात बदल करावे लागतील असा सल्लाही शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
महाराष्ट्र जिंकण्यासाठी सज्ज
भाजपा आणि मोदी सरकार यांच्या विश्वासाला जनतेमध्ये तडा बसला आहे. मोदींची गॅरंटी राहिली नाही. लोकसभेच्या ४८ जागा होत्या, त्यापैकी आमच्या तीन पक्षाने ३०, ३१ जागा जिंकल्या. विधानसभा मतदारसंघांचा विचार केला, तर १५५ मतदार संघामध्ये आम्हा लोकांचा विजय झाला. २८८ जागेची विधानसभा त्यातील १५५ मतदार संघात विरोधकांना बहुमत मिळते याचा अर्थ जनतेचा कल हा महाविकास आघाडीकडे आहे. त्या दुष्टीने आम्ही महाराष्ट्र जिंकण्यासाठी काळजीने पावले टाकणार आहे असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांच्या पाठीशी मी उभा
आता महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राची सत्ता त्यांच्या हातात जर गेली तर तुमच्या मालाची किंमत आणखी घसरेल. ती आम्हाला घसरून द्यायची नाही त्यासाठी राज्याची सत्ता सुद्धा हातात घ्यायची आहे. चार वेळेला महाराष्ट्राच्या जनतेने माझ्या हातात सत्ता दिली मुख्यमंत्री म्हणून आणि त्याच्यामध्ये लोकांसाठी जे काही करणे शक्य आहे ते त्या ठिकाणी केलं. आज ते होत नाही आणि ते होईल असं जर बघायचं असेल तर उद्याची विधानसभा सुद्धा जिंकावी लागेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हा लोकांचे सहकार्य पाहिजे हे काम तुम्ही करा मी माझे काम करतो. कसे लोकांना चांगली किंमत मिळत नाही हे मी बघतो, तुमच्या पाठीशी उभा राहतो असा विश्वास शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिला.