शरद पवार-देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर; जयंत पाटीलही उपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 10:18 AM2023-08-13T10:18:58+5:302023-08-13T12:04:34+5:30
त्यानंतर शेतकऱ्यांशी चर्चा करणार असून, सायंकाळी ६.४५ ते बारामतीकडे प्रयाण करतील.
सोलापूर – शनिवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार यांची गुप्त बैठक झाल्याची बातमी समोर आली. कोरेगाव पार्क येथील एका उद्योजकाच्या घरी काका पुतणे भेटले. या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. तर आज रविवारी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार आहेत. याआधी पुण्यातील कार्यक्रमात पवार-फडणवीस एकत्र आले होते.
भाई गणपतराव देशमुख यांच्या सांगोला येथील पुतळ्याच्या अनावरणासाठी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रविवार दि. १३ ऑगस्ट रोजी एकाच मंचावर येणार आहेत. पवार यांचे सकाळी १०.४० वाजता सोलापूर विमानतळावर आगमन होणार असून, त्यानंतर ते आयटी पार्कचे भूमिपूजन करतील. दुपारी २.४५ वाजता मोटारीने त्यांचे सांगोला येथे आगमन होणार आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ६ दरम्यान ते स्मारक अनावरण समारंभास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांशी चर्चा करणार असून, सायंकाळी ६.४५ ते बारामतीकडे प्रयाण करतील.
फडणवीस यांचे दुपारी १२.४० वाजता त्यांचे सोलापूर विमानतळ येथे आगमन होणार आहे. दुपारी १२.४५ वाजता विमानतळ येथून ते न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोल्याकडे मोटारीने प्रयाण करणार आहेत. दुपारी २.३० वाजता स्व. डॉ. गणपतराव देशमुख स्मारक अनावरण व महाविद्यालय नामांतर सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर सायंकाळी ४ वाजता मोटारीने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण करणार आहेत. सायंकाळी ५.३५ वाजता ते विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत.
अजित पवार-शरद पवार भेट
शनिवारी एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि अजित पवार दोघेही पुण्यात होते. तेव्हा कोरेगाव पार्क येथील उद्योपती अतुल चोरडिया यांच्या घरी काका-पुतण्यांची भेट झाली. या भेटीबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली. परंतु माध्यमांना याची माहिती मिळताच ते चोरडियांच्या निवासस्थानाबाहेर जमले. सुरुवातीला शरद पवारांचा ताफा घराबाहेर पडला त्यानंतर पाऊण तासाने अजित पवारांची कार बंगल्याबाहेर पडली. परंतु त्या वाहनात अजित पवार नव्हते. माध्यमांना चकवा देण्यासाठी अजित पवारांनी रिकामी कार बंगल्याबाहेर पाठवली. त्यानंतर दुसऱ्या कारमधून ते मागच्या सीटवर खाली लपून बाहेर पडल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले.