मुंबई – एकीकडे राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी म्हणायचे आणि दुसरीकडे पडद्यामागून राष्ट्रवादीसोबत युतीची चर्चा करायची ही भाजपाची नीती आहे. हा भाजपाचा दुतोंडीपणा नाही का? याचे स्पष्टीकरण भाजपाने दिले पाहिजे. त्याचसोबत शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता परंतु ते दुखावले गेले होते. म्हणून त्यांनी राजीनामा दिला असा गोप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता परंतु या लोकांनी सातत्याने भाजपा, भाजपा, भाजपा आग्रह धरला होता, त्यामुळे पवार दुखावले गेले होते. त्यातून तो राजीनामा दिला. शरद पवारांना राजीनामा देण्याची अजिबात इच्छा नव्हती. तुम्हाला ती नाटके वाटत असतील पण आमच्यासाठी ते वास्तव होते. महाराष्ट्राची जनता, कार्यकर्त्यांचा आग्रह पवारांनी राजीनामा मागे घ्यावा असा होता, त्या व्यासपीठावर समिती वैगेरे काही नको, तुम्हालाच अध्यक्षपद स्वीकारावे लागेल असं भुजबळ म्हणाले होते. इथं तानाशाही आहे असं ते सांगतात. राजीनामाबाबत कमिटी पवारांनी स्थापन केली होती. जर ते हुकुमशाह असते तर त्यांनी थेट राजीनामा देत ही व्यक्ती अध्यक्ष होईल असा आदेश दिला असता असंही सुप्रियाताईंनी म्हटलं.
तसेच पहाटेचा शपथविधी, २ जुलैचा शपथविधी पवारांना माहिती नव्हता. शरद पवार विचारधारेनुसार इतके वर्ष वागले. राजीनामा देताना शरद पवारांनी सांगितले मी तुमच्यासोबत येणार नाही. तुम्ही जा, मला अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता. शरद पवारांची भाजपासोबत जाण्याची इच्छा नव्हती. आमची वैचारिक भूमिका यशवंतराव चव्हाणांची आहे. त्यामुळे भाजपासोबत जाणारे मला न पटणारे होते. मी अध्यक्ष झाले असते तर पहिला निर्णय भाजपासोबत जाण्याचा त्या लोकांना करायचा होता. तो मला अशक्य होता. ती माझी विचारधारा नव्हती. माझ्या वडिलांची भूमिका नव्हती. त्यामुळे मला तडजोड करणे शक्य नव्हते. हे मला अस्वस्थ करणारे होते. एकाबाजूला सत्ता आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष होता. मी सत्तेपेक्षा संघर्षाचा मार्ग स्वीकारला. भुजबळ जे म्हणाले ते खरे आहे. पण माझ्या विचारधारेशी, वडिलांशी आणि तत्वाशी मी ठाम राहिले असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही वयानंतर आपल्यावर जबाबदाऱ्या येतात. भुजबळ म्हणाले त्यावर मीही बोलू शकते. वैयक्तिक गोष्टी बाहेर बोलायच्या नसत्या. मी काही लपवत नाही. मी रोज एक डायरी लिहिते, दिवसभर ज्या गोष्टी आयुष्यात घडतात ते मी डायरीत लिहिते, त्यामुळे भुजबळांच्या मुलाखतीतील घटना आणि माझ्या डायरीतील घटना मी जुळवून पाहिल्या. ती माझी सवय आहे. मला लहानपणापासून सवय आहे. २ जुलैच्या शपथविधीपूर्वी रात्री काय चर्चा झाली हे माझ्या डायरीत लिहिलंय आहे. परंतु ती डायरी बाहेर येणार नाही. एवढी मी प्रगल्भ आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.