पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार दरवर्षी कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करतात. तसेच दिवाळी पाडव्यादिवशी पवार कुटुंबीय बारामतीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन शुभेच्छांचा स्वीकार करत असतात. यावर्षीही दिवाळी पाडव्यानिमित्त आज सकाळी पवार कुटुंबीयांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, तसेच रोहित पवार उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. दरम्यान, अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोठे विधान केले आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत म्हणाले की, अजित पवार यांच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर अजितदादा यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे अजित पवार यांनी दिवाळीनिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी येणे टाळले. अजित पवार यांच्या ताफ्यामधील दोन वाहन चालक आणि तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे पवार कुटुंबाकडून दिवाळी निमित्त होणाऱ्या भेटीगाठीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र शरद पवार यांनी याबाबत स्वत: स्पष्टीकरण देत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पवार कुटुंबीय हे दरवर्षी दिवाळी पाडव्या दिवशी बारामती येथील निवास्थानी ग्रामस्थ, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असतात. यासाठी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
दरम्यान, दिवाळीची भेट म्हणून पंतप्रधान मोदींनी पेट्रोल आणि डिझेल किंमतीच्या दरात कपात केली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातही यांचे दर कमी होणार का? यावर जनतेचे लक्ष लागून आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरकपातीवर भाष्य केले आहे. याबाबत आम्ही राज्य सरकारसोबत बोलत असल्याचे पवार म्हणाले आहेत. बारामतीत स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पवार म्हणाले, पेट्रोल डिझेलच्या दराबाबत नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी आम्ही राज्य सरकार सोबत बोलत आहोत. सरकारला याबाबत मार्ग काढण्यास निश्चितच सुचवलेलं आहे. परंतु केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीची जे देणं लवकर द्यावं. ते दिल्यानंतर लोकांना मदत करण्याचा निर्णय घेणे शक्य होईल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.