"माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं"; शरद पवारांचे मिश्किल वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 07:10 PM2024-07-17T19:10:02+5:302024-07-17T19:10:46+5:30

पिंपरी-चिंचवडमधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

Sharad Pawar funny statement says I never imagined myself as magician NCP  | "माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं"; शरद पवारांचे मिश्किल वक्तव्य

"माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं"; शरद पवारांचे मिश्किल वक्तव्य

Sharad Pawar: पिंपरी चिंचवड शहराचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील मोदीबाग येथे पक्षप्रवेश झाला. भोसरी विधानसभेतील माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. तसेच आज शरद पवार यांनी पुणे पत्रकार संघात पत्रकारांशी वार्तालाप केला. शरद पवार यांचा उल्लेख 'जादूगार' असा केला जात असल्यावरून खुद्द पवार यांनीच मिश्किल वक्तव्य केले.

"आमच्या इथे कॉलेजात एक जादूगार राहत होते. त्यांची भेट घ्यायचो. काही जादू शिकता येते का ते पाहायचो. चेष्टेचा भाग सोडून द्या. तुम्हाला भेटता आले याचा मला अधिक आनंद आहे. पत्रकार आणि वृत्तपत्र यांच्याशी माझा कधी न कधी संबध आला. सकाळ वृत्तपत्रात मी आणि माझे मित्र विठ्ठल मणियार यांनी मुलाखत दिली होती. त्यानंतर आमची निवड झाली. नंतर आपणच एक वृत्तपत्र काढावे असं वाटलं नंतर मग मी आणि माझ्या मित्राने नेता हे वृत्तपत्र काढले, थोडे दिवस ते चाललं, नंतर बंद पडलं. माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं," असे उत्तर शरद पवार यांनी दिले.

विधान परिषदेतील जयंत पाटलांच्या पराभवावर...

"काँग्रेसकडे अधिकचे मते होती. आमच्याकडे बारा मते होती. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे आमच्यापेक्षा जास्त मतं होती. काँग्रेसने पहिले पसंतीचे मत त्यांच्या उमेदवाराला देणं साहजिकच आहे. पण, उरलेली पहिली आणि दुसऱ्या पसंतीक्रमाची मतं योग्यपणे दिली असती, तर तीनही उमेदवार निवडून आले असते. आमची रणनीती चुकली", असे त्यांनी मान्य केले.

जयंत पाटील यांना पाठिंबा का दिला?

"जयंत पाटील यांच्याबाबत महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये निर्णय झालेला नव्हता. माझ्याकडे १२ मते होती. शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा असे आम्हाला वाटत होते. कारण, लोकसभा आम्ही डाव्या पक्षांसोबत लढवली होती. त्यांनी काही जागा मागितल्या होत्या, पण ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो. त्यामुळे जयंत पाटील यांना आम्ही पाठिंबा देण्याचे ठरवलं होते," असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले.

Web Title: Sharad Pawar funny statement says I never imagined myself as magician NCP 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.