Sharad Pawar News: आगामी विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात न होता डिसेंबर महिन्यापर्यंत लांबणीवर पडण्याचा अंदाज वर्तवविला जात आहे. महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याची चर्चा आहे. याबाबत आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. यावरून शरद पवार यांनी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारला कानपिचक्या दिल्या. पत्रकारांशी बोलताना संभाजी भिडे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर शरद पवारांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली.
मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठले काढले? आरक्षण कशाला पाहिजे तुम्ही सिंह आहात, देश चालवा आपले जंगल चालवा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचा जीवन गाडा हाकत आहेत. महाराष्ट्रात दररोज नवनवीन समस्यांची पालवी फुटत असते. त्यावर रामबाण उपाय करण्याचे काम शासन चांगले पार पाडत आहेत, असे संभाजी भिडे यांनी म्हटले होते. संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या विधानावरून पत्रकारांनी शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली.
संभाजी भिडे वगैरे कॉमेंट्स करायच्या लायकीची माणसे आहेत का?
संभाजी भिडेंच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेबाबत विचारणा केली असता त्यावर प्रतिक्रिया देण्यास शरद पवार यांनी नकार दिला. माध्यम प्रतिनिधींनी संभाजी भिडे यांच्याबाबत प्रश्न विचारायला सुरुवात केली. परंतु, तो पूर्ण व्हायच्या आधीच शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. संभाजी भिडे वगैरे कॉमेंट्स करायच्या लायकीची माणसे आहेत का? काहीही प्रश्न विचारता का? म्हणूनच तुम्हाला भेटायचे नाही म्हणत होतो. हल्ली कसेही प्रश्न विचारतात. एकंदर आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे. संभाजी भिडे आणि अमुक-तमुक, असे सांगत शरद पवार यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.
दरम्यान, बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यात काही ठिकाणी बंद पाळण्यात येणार आहे. संभाजी भिडे यांनी यावरुन राजकीय नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, बांगलादेशातील सुरू असलेल्या अत्याचाराबाबत एकही राज्यकर्ते बोलत नाही हे वाईट आहे, या विषयावर उद्धव ठाकरे यांनीही बोलावे, ते या विषयावर बोलत नाहीत, अशी विचारणा संभाजी भिडे यांनी केली.