Sharad Pawar Jayant Patil Prateek Patil | मुंबई, कराड: राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेतृत्वाखालील सरकार आहे. या सरकारमधील शिवसेना खरी की ठाकरे यांच्याकडची शिवसेना खरी याबाबत वर्षभरापासून वेगवेगळे मतमांततरे पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान आता राज्यात राजकारणाला नवी कलाटणी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार बऱ्याच आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सामील झाले. रविवारी अजितदादांसह ९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. या अभूतपूर्व राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाला भेट देत शक्तीप्रदर्शन केले. पक्षाच्या या संघर्षाच्या काळात पक्षासाठी एक बाप-बेटे मैदानात उतरल्याचे दिसून आले ते म्हणजे, जयंत पाटील आणि प्रतीक पाटील.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कालपासून मुंबईत तळ ठोकून बसले आहेत तर त्यांचे पुत्र प्रतीक पाटील हे शरद पवार यांच्या समर्थनार्थ कराड येथे दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासह कराड येथे आमदार रोहित पवार, आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारीही उपस्थित आहेत. जयंत पाटील मुंबई येथे थांबून सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवत आहेत व येणाऱ्या काळाची व्यूहरचना आखत आहेत. त्यामुळे पिता-पुत्र एकत्रपणे शरद पवारांच्या पाठीशी दिसले.