मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नायक ठरलेले शरद पवार यांचा आज 80वा वाढदिवस आहे. राजकारणाशिवाय साहित्य, नाट्य, कला, चळवळ, अर्थकारण, समाजकारण, विचारवंत, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर अशा अनेक क्षेत्राची खडानखडा माहिती ठेवणारे, त्यांच्या क्षेत्रात काय चालले आहे याविषयी स्वत:ची पक्की बैठक असणारे नेतृत्व म्हणजे शरद पवार होय. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यातही शरद पवार अग्रेसर असतात. मात्र या आधुनिकतेसोबत आलेली एक बाब शरद पवार यांना चांगलीच खटकते. किंबहुना त्याचा त्यांना प्रचंड राग येतो.
विधानसभा निवडणुकीपासून शरद पवार यांच्या फॉलोवर्समध्ये तरुणांची संख्या वाढली आहे. तरुणाईला आपल्या आवडत्या नेत्यासोबत फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्याची फारच घाई झालेली असते. मोबाईलला फ्रन्ट कॅमेरा आल्यापासून सेल्फी फोटो उदयास आला. आवडत्या व्यक्तीमत्त्वासोबत फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी तरुणाई उत्सुक असते. मात्र सेल्फी या प्रकाराचा शरद पवार यांना चांगलाच राग येतो. किंबहुना शरद पवार यांच्यासोबत काढलेले सेल्फी फारसे पाहायला मिळत नाही.
सेल्फी काढणे पवारांना आवडत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी शरद पवार व्यासपीठाकडे जात असताना एक तरुण शरद पवार यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. ही बाब शरद पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या तरुणाला खडसावले होते.
या व्यतिरिक्त मोदी बागेतील शरद पवार यांच्या निवासस्थानी सामाजिक क्षेत्रातील मंडळी काही दिवसांपूर्वी चर्चेसाठी गेली होती. त्यावेळी पवारांनी तासभर या मंडळीशी चर्चा केली. चर्चा आटोपताच सर्वांनी पवारांसोबत फोटो काढले होते. पवारही सर्वांना फोटो काढताना प्रतिसाद देत होते. मात्र त्याचवेळी एका तरुणाने पवार यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी देखील शरद पवार संतापले होते. तसेच सेल्फी न काढण्याच्या त्यांनी सूचना केल्या होत्या. यावरून पवार यांना सेल्फी काढणे हा प्रकार आवडत नसल्याचे स्पष्ट होते.