मुंबई - प्रसिद्ध आभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी Why I Killed Gandhi या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याचे समोर आल्यापासून राज्याच्या राजकारणात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील पुरोगामी विचारवंत मंडळींकडून अमोल कोल्हेंवर टीका होत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही नेत्यांनी नथुरामची भूमिका साकारल्याने अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आपलं मत मांडलं असून, त्यांनी चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हे यांना पाठिंबा दिला आहे.
अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेबाबत मत मांडताना शरद पवार म्हणाले की, महात्मा गांधी यांच्यावर आधारित गांधी हा चित्रपट जगभरात गाजला होता. त्या चित्रपटामध्ये सुद्धा नथुराम गोडसे याचे पात्र होते. ती भूमिका साकारणाराही कलाकार होता. तसेच कलाकार म्हणून अमोल कोल्हेंच्या भूमिकेकडे पाहिले पाहिजे, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांनीच पाठिंबा दिल्याने कालपासून टीकेचे लक्ष्य झालेल्या अमोल कोल्हे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी अधिक स्पष्टपणे विचार मांडताना शरद पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटामध्ये एखादा कलाकार औरंगजेब बादशाहची भूमिका साकारतो. मात्र त्याचा अर्थ तो मुघलांचा समर्थक असतो, असा होत नाही. तसेच रामायणामध्ये रावणाची भूमिका करणाऱ्याने सीतेचं अपहरण केलं, असा त्याचा अर्थ होत नाही. तसेच अमोल कोल्हे यांनी जी भूमिका केली आहे ती एक कलावंत म्हणून केली आहे. त्याचा अर्थ ते गांधीविरोधी आहेत, असा होत नाही. तसंच या विषयी भाजपाकडून होणाऱ्या टीकेवरूनही त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे. भाजपा गांधीवादी कधीपासून झाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला.