Supriya Sule daughter Revati: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे हिने नुकतेच परदेशात आपल्या शिक्षणाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. शरद पवारांची नात असलेल्या रेवतीने लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स येथून अर्थशास्त्रातील पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. निकाल जाहीर झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून एका आईच्या मनातली भावना पोस्टद्वारे व्यक्त केल्या.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'आमची लेक रेवती हिने लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समधून मास्टर्स डिग्री मिळवली आहे. तिच्या या यशामुळे आम्हाला तिचा अभिमान वाटतो. आम्हाला तिचे पालक असल्याचा गर्व आहे. आजच तिचा निकाल आला असून आम्ही तिच्या या यशामुळे खूप आनंदी आहोत. तिच्या ग्रॅज्युएशनच्या प्रवासात आम्ही तिच्यासोबत कायम असणं शक्य झालं नाही याबद्दल मला दु:ख आहे, पण आयुष्यात असं घडतंच असतं. यालाच जीवन म्हणतात," असे सुप्रिया सुळेंनी ट्विट केले.
लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स ही एक जगविख्यात शिक्षणसंस्था आहे. या शिक्षणसंस्थेतून पदवी घेतलेले अनेक विद्यार्थी पुढे दिग्गज म्हणून नावारूपास आले. जगभरातील अनेक महान व्यक्तींनी येथेच शिक्षण घेतले. भारतातील महान लोकांनी येथे शिक्षण घेतले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही याच संस्थेतून अर्थशास्त्रातील पीएचडी केली. तसेच माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन, माजी संरक्षण मंत्री व्ही. के. मेनन, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले ज्योती बसू यांनीही याच संस्थेतून शिक्षण घेतले आहे.