Sharad Pawar vs Sanjay Raut : शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीतील एका कार्यक्रमात सत्कार केला. या सोहळ्यानंतर ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि इतर नेतेमंडळींनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यानंतर आता संजय राऊतांनी राज ठाकरेंचा ( Raj Thackeray ) पक्ष असलेल्या मनसेच्या ( MNS ) पुस्तक प्रदर्शनाला हजेरी लावली. ही बाब शरद पवार गटाला चांगलीच खटकली. शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आणि युवक मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी राऊतांना दुटप्पी भूमिका असणारा राजकारणी म्हटले. तसेच, राजकीय प्रामाणिकपणाचा अभाव असलेल्या नेत्यांनी उगाचच नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत, असा खोचक सल्लाही दिला.
अप्रत्यक्षपणे महायुतीशी जवळीक साधण्याचा हा प्रयत्न?
"संजय राऊत यांनी मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला उपस्थित राहून पुन्हा एकदा आपली राजकीय दुटप्पी भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवारांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत पुरस्कार देऊन गौरवले असता संजय राऊत यांनी त्यावर कडाडून टीका केली होती. त्याच राऊतांनी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमाला जाऊन सहभाग घेतल्याने त्यांची राजकीय निष्ठा आणि विचारधारा प्रश्नचिन्हांच्या भोवऱ्यात सापडली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे, ही वस्तुस्थिती सर्वश्रुत आहे. तरीही संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तक प्रदर्शनात उपस्थित राहून अप्रत्यक्षपणे महायुतीशी जवळीक साधण्याचा हा प्रयत्न नाही का? एका ठिकाणी महायुतीच्या विरोधात आग ओकायची आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांच्या कार्यक्रमांना हजेरी लावायची, याला काय म्हणावे? असा प्रश्न आता शिवसेनेच्या कट्टर कार्यकर्त्यांनीही विचारायला हवा," असे रोखठोक मत अमोल मातेले यांनी मांडले.
राजकीय प्रामाणिकपणाचा अभाव असलेले नेते...
"संजय राऊत यांनी स्वतःला मोठा राजकीय विश्लेषक समजण्याचा प्रयत्न करावा, पण ते स्वतःच कोणत्या विचारधारेचे आहेत हे त्यांनाच माहीत नाही. राजकीय मतभेद असतील तर ताठ मानेने विरोध करावा. पण एका ठिकाणी शिवसेनेच्या गद्दारांना गद्दार म्हणायचं आणि दुसरीकडे त्यांनाच अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्या नेत्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं, हा काय प्रकार आहे? राजकीय प्रामाणिकपणाचा अभाव असलेल्या नेत्यांनी उगाचच नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत. संजय राऊत यांची ही कृती म्हणजे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला आणखी एक धक्कादायक पवित्रा आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांच्या विधानांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.