"म्हणूनच अजित पवार गटावर उत्तर सभा घेण्याची वेळ आली"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 05:22 PM2023-08-28T17:22:33+5:302023-08-28T17:22:55+5:30
शरद पवार गटाने घेतला जोरदार समाचार, केली सडकून टीका
Sharad Pawar vs Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसची मंगळवारी जिल्हा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रभारी यांची पवार साहेबांच्या उपस्थितीत बैठकमहाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यात दलित तरुणांना झाडावर उलट टांगून मारहाण केली या घटनेचा साधा निषेध ही बीडच्या सभेमध्ये जमलेल्या मंत्र्यांनी केला नाही याची खंत वाटते. राज्यातील नेतेमंडळींना राज्यात वाढत चाललेल्या असहिष्णुतेच्या घटना दिसत नाहीत हे दुर्दैव आहे. शरद पवारांच्या राजकीय विचारांच्या विपरीत जाऊन काही नेते सरकारमध्ये समाविष्ट झाले व आता त्यांचं अंतर्मन त्यांना खात असल्यामुळे त्यांच्यावर उत्तर सभा घेण्याची वेळ आली आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनी लगावला.
बीड मधील सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर झालेल्या टीकेचा खरपूस समाचार महेश तपासे यांनी घेतला. "ज्यांना ज्यांना शरद पवारांनी मोठे केले ते सर्व नेते पवारांना विसरून सत्तेत मस्त झाले. आपली वैचारिक बांधिलकी धर्मनिरपेक्षतेसोबत आहे याचा विसर काही नेत्यांना पडला आणि अनेकांनी व्यक्तिगत कारणामुळे भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा. शरद पवार देशातले एक वरिष्ठ नेते आहेत. ह्या नेतृत्वावर वेळोवेळी आरोप करून त्यांचं राजकीय महत्त्व कमी करण्याचा डाव राज्यातच नव्हे तर देशपातळीवर अनेक वेळा झाला. आपल्यावर होणाऱ्या आरोपांमुळे पवार कधी डगमगले नाही व सोडून गेलेल्या साथीदारांची फिकीर त्यांनी कधीच केली नाही. त्या उलट प्रत्येक वेळेस नवीन नेतृत्व राज्यात उभा करण्याची कामगिरी पवारांनी केली", अशी आठवण तपासे करून दिली.
"राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे लोकशाहीला व धर्मनिरपेक्षतेला घातक असलेल्या पक्षासोबत जाणार नाही यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे पवारांच्या भूमिकेवर संशय घेण्याचं कारण नाही. पक्षातील आमदार गेले तरीही पवारांनी भूमिका सोडली नाही व महाविकास आघाडी भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून कार्य सुरू ठेवले आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचार कधीही पवार सोडणार नाहीत याची खात्री असल्यानेच आज जनता पवारांसोबत आहे," असेही तपासे म्हणाले.
शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना राज्यात मिळत असलेल्या प्रतिसादामुळेच भाजप व यांच्या मित्रपक्षाची डोकेदुखी वाढली असून पक्ष व नेते फोडण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. नेत्यांनी कितीही विचारांसोबत फारकत घेतली तरीही कार्यकर्ता विचार सोडत नाही असा महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आहे. 2024 च्या निवडणुकीमध्ये देशातील तरुण पिढी ही मोदींच्या जुमल्यांना बळी पडणार नाही ही वस्तुस्थिती आहे," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.