मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचं काम हे शरद पवार यांनी केलं, अशी टीका अमित शाह यांनी केली होती. या अमित शाह यांच्या टीकेला शरद पवार यांनी आज उत्तर दिले आहे.
सुप्रीम कोर्टानं अमित शाह यांना तडीपार केलं होतं. मात्र तरीही तडीपार केलेल्या व्यक्तीला गृहमंत्री करण्यात आले, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. शरद पवार म्हणाले, "अमित शाह आधी गुजरातचे मंत्री होते. तेव्हा कायद्याचा चुकीचा वापर केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने अमित शाह यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं. तो माणूस आता देशाचा गृहमंत्री झाला आणि देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेऊन अशी वक्तव्यं करत आहे", असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, अमित शाहांवर केलेल्या टीकेवरून भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे. "शरद पवार वैफायल्यातून टीका करत आहेत. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. तरीही अशी टीका करतात. शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी विमानातून आणलं होतं. मग यावर आम्ही टीका करायची का? यापूर्वी कधी असं झालं नाही", असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. तसंच, मोदी सरकारच्या काळात कलम ३७० हटवण्यात आले, यापूर्वी कधी असं झाले नाही, असा पलटवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.
याचबरोबर, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे जुने मित्र आहेत. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. वंदनीय शिवसेनाप्रमुख यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्यात बरेच मुख्यमंत्री होऊ लागलेत. काँग्रेसचे वेगळे मुख्यमंत्री, उबाठाचे वेगळे, राष्ट्रवादीचे वेगळे असे बरेच मुख्यमंत्री आहेत. राज्याची जनता ठरवेल, राज्यात महायुतीचा सरकार येणार महायुतीचाच मुख्यमंत्री होणार आहे. लोकसभेला वेगळी परिस्थिती होती. मात्र, विधानसभेला महायुतीचेच सरकार येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
अमित शाहांची बोचरी टीकागेल्या रविवारी पुणे येथील बालेवाडी येथे भाजपचे राज्य कार्यकारिणीचे अधिवेशन झाले. यावेळी अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं. जेव्हा जेव्हा राज्यात भाजपची सत्ता आली, तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालं. जेव्हा शरद पवार यांची सत्ता येते, तेव्हा मराठा आरक्षण जातं. २०१४ ला भाजप सत्तेत आली मराठा आरक्षण आलं, २०१९ ला शरद पवार सत्तेत आले मराठा आरक्षण गेलं, तेव्हा तुम्ही ठरवा काय करायचं ते असं अमित शाह म्हणाले होते.