मुंबई - भाजपसोबत जाण्याबाबतच्या निर्णयाची माहिती शरद पवार यांना दिली होती. शरद पवारांनी मला बोलावून सांगितले की, आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) दोन दिवसीय चिंतन शिबिराचा समारोप करताना पवार यांनी राष्ट्रवादीत पडलेली फूट आणि सत्ता स्थापनेनंतरचा घटनाक्रम प्रथमच सविस्तरपणे उलगडला.आम्ही २ जुलैला घेतलेला निर्णय आवडला नव्हता, तर १५ दिवसांनी १७ जुलैला आम्हा सगळ्या मंत्र्यांना त्यांनी चव्हाण प्रतिष्ठानला कशाला बोलवले? तुम्ही आम्हाला गाफील ठेवायचे का? अशी उद्विग्नता अजित पवार यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, सर्व ठीक आहे! - प्रफुल्ल पटेल, मी, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे असे आम्ही १० ते १२ जण ‘देवगिरी’वर बैठकीसाठी बसलो. - सरकारमध्ये जाण्याबाबत शरद पवारांना थेट सांगण्याआधी सुप्रियाला सांगितले. तेव्हा तिने सांगितले की, ‘मला सात ते दहा दिवस द्या. मी साहेबांना राजी करते.’ आम्ही १० दिवस थांबलो. - तेव्हा जयंत पाटील, अनिल देशमुखही तिथे होते. त्यानंतर आम्ही थेट शरद पवारांकडे गेलो. त्यांनी सर्व ऐकले. ते म्हणाले, ‘ठीक आहे!’ असा दावा अजित पवारांनी केला.
उद्योगपतीकडे का बोलावले? १२ ऑगस्टला पुण्यातील एका उद्योगपतीकडे बोलवले. त्यांनी सांगितले इथे वरिष्ठ (शरद पवार), जयंत पाटील, तुम्ही आणि मी एकत्र जेवायचे. निरोप आल्यानंतर मी गेलो. पूर्ववत एकत्र येण्याचा निर्णय झाला. दीड महिना उलटला तरी निर्णय झाला नाही. जर निर्णय घ्यायचाच नव्हता तर कशासाठी हे सगळे केले. कुणासाठी केले, असा सवाल त्यांनी केला.
धरसोड वृत्ती, गाफील ठेवणे बरोबर नाही!पुस्तक प्रकाशनानंतर शरद पवार यांनी राजीनामा दिला. पण, त्यानंतर आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांनी बोलवून घेतले आणि त्यांना सांगितले, “उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक, महिला व युवक पाहिजेत. त्यांनी तिथे आंदोलन करून मागणी करायची की राजीनामा परत घ्या.” तेव्हा मला प्रश्न पडला की, राजीनामा द्यायचा नव्हता तर दिलाच का? त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. आम्हाला सांगितले की, माझ्यानंतर सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. सगळ्या गोष्टी ठरल्या. सगळ्यांनी तयारी दाखवली. ही धरसोड वृत्ती, गाफील ठेवणे बरोबर नाही. हे मला पटत नाही. तुम्ही एकदा काय ते ठरवा, हेही मी त्यांना सांगितल्याचे अजित पवार म्हणाले.
...तर उपमुख्यमंत्रिपद चारदा मिळाले नसते : जितेंद्र आव्हाड- तुम्ही पवार नसता, तर बारामतीतून निवडून आला असता का? अहो, तुमची पुण्याई की तुम्ही त्यांच्याच घरात जन्माला आलात. आव्हाडांच्या घरात जन्माला आला असता तर तुम्हाला चार वेळा उपमुख्यमंत्रिपद मिळाले नसते.- बंडखोरी केल्यानंतरही तुम्हाला पक्षात घेतले नसते. शरद पवारांचा पुरोगामीत्वाचा चेहरा पुसून टाकायचा, त्यांचा राजकीय प्रवास धुळीला मिळवायचा, पण आपण सत्तेत राहायचे हे आम्हाला नामंजूर होते, असा गौप्यस्फोट करत शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले.