आधी ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा अन् आता काँग्रेस नेत्यांसोबत खलबतं; शरद पवार आखतायत विधानसभेसाठी खास 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 03:32 PM2024-07-24T15:32:13+5:302024-07-24T15:33:44+5:30

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही जागावाटपाचा तिढा शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहू नये, असा मविआ नेत्यांचा प्रयत्न आहे.

Sharad Pawar has a special plan for the maharashtra assembly election 2024 meeting with congress leaders | आधी ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा अन् आता काँग्रेस नेत्यांसोबत खलबतं; शरद पवार आखतायत विधानसभेसाठी खास 'प्लॅन'

आधी ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा अन् आता काँग्रेस नेत्यांसोबत खलबतं; शरद पवार आखतायत विधानसभेसाठी खास 'प्लॅन'

Sharad Pawar ( Marathi News ) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सप्टेंबर महिन्यात विधानसभेसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते रणनीती ठरवत असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पवार यांची भेट घेऊन विधानसभा जागावाटपावर सविस्तर चर्चा केल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, नुकतीच सिल्व्हर ओक इथं शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपावर प्राथमिक चर्चा झाली. ज्या मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार आहेत ती जागा सदर पक्षाला सोडली जावी, त्याव्यतिरिक्तचे जे मतदारसंघ आहेत तिथं स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन जागावाटप व्हावं, यावर पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही जागावाटपाचा तिढा शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहू नये, असा मविआ नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच निवडणूक जाहीर होण्यास अवधी असतानाही नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे.

काही दिवसांपूर्वी ठाकरे-पवारांच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठक!

मुंबईतील एका हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीतही विधानसभेच्या जागावाटपाबाबत सखोल चर्चा झाली होती. विधानसभा निवडणुकीत समसमान जागा लढवण्याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे विधानसभेला मविआतील तिन्ही पक्ष प्रत्येकी ९० ते ९५ जागा लढवण्याची शक्यता आहे. 

महायुतीतही बैठकांचा सिलसिला!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल रात्री उशिरा भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे या राष्ट्रवादीच्या दोन खासदारांसह अजित पवार दिल्लीत दाखल झाले होते. त्यानंतर मध्यरात्री १ वाजता त्यांनी अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीतील महायुतीचं जागावाटप आणि निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काय रणनीती हवी, याबाबत कालच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

Web Title: Sharad Pawar has a special plan for the maharashtra assembly election 2024 meeting with congress leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.