राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनं राज्यातील राजकारणात पुन्हा काही हालचाली सुरू झाल्यात का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पुण्यातील व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात काल शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटीलही हजर होते. या भेटीबाबत कुणालाही काही कळवण्यात आले नव्हते. चांदणी चौकातील पूलाच्या उद्घाटनासाठी अजित पवारही पुण्यात होते. या कार्यक्रमानंतर कोरेगाव पार्क येथील चोरडिया यांच्या निवासस्थानी शरद पवार-अजित पवार यांच्यात भेट झाली.
सदर भेटीवर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद पवार देखील भाजपाला पाठिंबा देणार का?, एनडीएमध्ये सहभागी होणार का?, असे प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आता स्वत: शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोक मला भाजपासोबत या, अशी विनंती करत आहे. मात्र राष्ट्रवादी पक्ष कधीच भाजपासोबत जाणार नाही. राष्ट्रवादीतील एक गट भाजपामध्ये गेला असला तरी मूळ पक्ष भाजपासोबत जाणार नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. सत्ताधारी पक्ष सत्तेचा गैरवापर करत आहे, सामान्य जनतेला हे आवडत नसून त्याचे परिणाम भविष्यात दिसतील, असा दावाही शरद पवारांनी केला आहे.
मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये १ सप्टेंबर रोजी विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे, यात पुढील रणनीतीविषयी चर्चा होणार असल्याचं शरद पवार म्हणाले. तसेच मणिपूरचा प्रश्न हा देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असल्याचं देखील शरद पवारांनी सांगितलं. अजित पवारांसोबतच्या बैठकीवर कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात गैर काय? असं शरद पवारांनी म्हटलं आहे. अजित पवार हा माझा पुतण्या आहे आणि पवार कुटुंबातील मी वडिलधारा माणूसआहे, त्यामुळे मला कुणी भेटायला आलं किंवा मी कुणाला भेटायला बोलावलं, हा चर्चेचा विषय बनू शकत नाही, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यासोबत उरलेल्या आमदार, खासदारांनी आमच्यासोबत यावे. आमच्या निर्णयाला शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आपण येणार नसाल तर पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि अन्य खासदारांना तरी पाठवा, अशी गळ अजित पवार यांनी यावेळी घातली. या बैठकीची पूर्वकल्पना दिल्लीला होती. सगळ्या परिस्थितीवर दिल्लीचे वरिष्ठ नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारीक लक्ष ठेवून होते. पूर्वनियोजित आखणीनुसार हे चालू होते. अजित पवार पुन्हा एकदा शरद पवार यांना भेटतील. त्यावेळी कदाचित त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलही असतील, असेही सांगण्यात येत आहे.
शरद पवार यांना सोडून कुठेही गेलेलो नाही, ते आमचे नेते- मंत्री वळसे-पाटील
सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा राजीनामा देऊ नये, यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच रोखले. वळसे-पाटील यांनीच याबाबतचा गौप्यस्फोट केला. ' हा प्रश्न व्यक्तिगत आहे, पण मला काम करायला सांगितले ही गोष्ट खरी आहे,' असे त्यांनी सांगितले. आम्ही शरद पवार यांना सोडून कुठेही गेलेलो नाही, ते आमचे नेते आहेत आणि राहतील, असेही त्यांनी संगितले.