Sharad Pawar Ajit Pawar Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पारा चढू लागला आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वेगळी राजकीय समीकरणे अस्तित्वात येण्याची चर्चाही रंगू लागली आहे. अजित पवार-शरद पवार एकत्र येऊ शकतात, अशा चर्चांनाही तोंड फुटले आहे. या सगळ्या मुद्द्यांवर शरद पवारांनी सविस्तर भूमिका मांडली.
शरद पवारांनी मुंबई तक ला मुलाखत दिली. या मुलाखतीत शरद पवारांनी अजित पवार किंवा त्यांच्यासोबतचे नेते वेगळा निर्णय घेणार नाही, असे विधान केले आहे. त्याचे कारणही शरद पवारांनी सांगितले.
अजित पवारांना धडा शिकवायचा आहे का?
अजित पवारांना तुम्हाला धडा शिकवायचा आहे का? तुम्हाला अजित पवारांना टार्गेट करायचं आहे का? त्यामुळे तुम्ही तिथे युगेंद्र पवारांना पुढे केलं?, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला.
शरद पवार म्हणाले, "अजिबात नाही. हे जे आमचे सहकारी भारतीय जनता पक्षाच्या बरोबर गेले, ते आमच्या वैचारिक चौकटीत बसू शकत नाही. ती जाण्याची भूमिका आमच्या सहकाऱ्यांनी घेतली. त्यांच्याशी वैयक्तिक सलोखा असेल, राजकीय सलोखा राहणार नाही."
अजित पवारांनी भाजपला सोडलं, तर परत घेणार का?
तुम्ही म्हणालात भाजपकडे तुम्ही जाऊ शकत नाही. अजित पवारांनी जर भाजप सोडलं, तर तुम्ही त्यांना परत घेऊ शकता का? असा प्रश्नही शरद पवारांना विचारण्यात आला.
शरद पवार म्हणाले, "सोडण्या संबंधीचा विचार काही लोक करतील, असं मला वाटत नाही. त्याचं कारण आजचं पुस्तकामध्ये एक गोष्ट प्रसिद्ध झाली. छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितले की आम्हा लोकांच्या मागे ईडीच्या चौकशा होत्या. त्यामुळे आम्हाला हे केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं."
"मोदींच्या हातात सत्ता असेपर्यंत कुणीही वेगळा निर्णय घेणार नाही"
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, "त्यांनी (छगन भुजबळ) हेही सांगितलं की, मी (छगन भुजबळ) स्वतः तुरुंगात होतो. तुरुंगातून सुटल्यावर माझा पुर्नजन्म झाला. याचा अर्थ स्वच्छ आहे की, ईडी आणि तत्सम ज्या एजन्सीज आहेत, त्याचा वापर सत्ताधारी पक्षाने यांच्याविरुद्ध केला आणि त्याला तोंड देण्यासंबंधी त्यांच्यात शक्ती नव्हती. त्यामुळे त्यांनी हा राजकीय निर्णय घेतला."
"हे (अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी) माझ्याकडे येणार नाहीत. जोपर्यंत दिल्लीत मोदींच्या हातात सत्ता आहे, तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही. यांच्यातील (अजित पवार गट) कुणीही वेगळा निर्णय घेणार नाही", असे शरद पवार म्हणाले.