मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या सिल्वर ओक निवासस्थानावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल केला. जवळपास १५० ते २०० कर्मचारी पवारांच्या घराजवळ पोहोचले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकच सवाल उपस्थित केला आहे.
शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला पोलीस यंत्रणेचं अपयश आहे. पोलिसांना हे आधी कळलं नाही का, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थित केला. आंदोलक शरद पवारांच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती माध्यम प्रतिनिधींना मिळते. तिथे माध्यम प्रतिनिधी कर्मचाऱ्यांसोबत पोहोचतात. माध्यमांना जे कळलं ते पोलीस यंत्रणेला का कळलं नाही, असा सवाल पवारांनी उपस्थित केला.
आंदोलक कर्मचाऱ्यांसोबत माध्यमांचे कॅमेरे पोहोचले. अर्थात ते माध्यमांचं कामच आहे. पण जे माध्यमांना जमलं, ते संबंधित यंत्रणेला का जमलं नाही, त्यांना हे का शोधून काढता आला नाही, असे प्रश्न पवार यांनी विचारले. पोलीस कमी पडले हे निर्विवाद सत्य असल्याचं पवार यांनी म्हटलंय
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उपमुख्यमंत्र्यांप्रमाणे पोलिसांच्या अपयशाकडे लक्ष वेधलं. पोलीस आणि पोलिसांची यंत्रणा काय करत होती, गुप्तहेर खातं काय करत होतं, असे प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केले. माध्यम प्रतिनिधींना माहिती मिळते. त्यांना दुपारी अडीच वाजताच मेसेज येतात. मग ते आंदोलकांसोबत शरद पवारांच्या घराबाहेर पोहोचतात. मग हे पोलिसांना कसं समजलं नाही, असा सवाल फडणवीसांनी विचारला. पवारांच्या घरावर झालेला हल्ला पोलिसांचं आणि गुप्तचर यंत्रणेचं अपयश असल्याचं फडणवीस म्हणाले.