मुंबई : शरद पवारांनी मला धुळे- नंदुरबार जिल्ह्याचे सर्वाधिकार दिले आहेत. माझी जेव्हा शरद पवारांची भेट झाली तेव्हा ते म्हणाले की, 'माझ्या हृदयात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विरोधकांचे काटे खुपत आहे', असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. धुळे येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी बोलताना गोटे म्हणाले की, येणाऱ्या ५ वर्षात भाजपच्या आमदार-खासदारांना घरी बसवले शिवाय राहणार नाही. तर जेव्हा पवारांची भेट झाली तेव्हा ते म्हणाले की, माझ्या हृदयात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विरोधकांचे काटे खुपत आहे. ते काटे तुम्हाला काढायचे आहे. त्यासाठी मी धुळे व नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचे यावेळी गोटे म्हणाले.
तर यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. माझा पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगितले की जसा मी आमदार झालो नाही, तसे तुम्हीही कधी मुख्यमंत्री होणार नाही. माझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली म्हणून भाजपचा राजीनामा देऊन शरद पवारांच्या सोबत आलो असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
तसेच, कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी योगदान द्यावे. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी पक्षाने मला महिन्याआधी जबाबदारी दिली असती तर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा राहीला असता. शरद पवार यांनी मला अधिकार दिलेले आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सोबत मी खंबीर उभा राहील. तुम्हाला दिलेल्या पदाचा उपयोग पक्ष वाढीसाठी करा असेही गोटे म्हणाले.