गेल्या काही दिवसांपासून मी पाहातोय सीमावाद उफाळून आला आहे आणि याला वेगळं वळण देण्याचं काम केलं जात आहे. राज्य सरकार काय करतेय याकडे पाहून चालणार नाही. हे जर २४ ते ४८ तासांत पूर्ण संपले नाहीतर माझ्यासह सगळ्यांना बेळगावच्या लोकांना धीर देण्यासाठी जावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
सीमावादावर आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे आणि स्थिती गंभीर झाली आहे, असे पवार म्हणाले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. तसंच महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
सोलापूरचा मी सात आठ वर्षे पालकमंत्री होतो. मला सोलापूरची संपूर्ण माहिती आहे. आणि हा प्रश्न माझ्या कालखंडामध्येमध्ये कधी कुणी मांडला नाही. जत असेल की गुजरातची सीमा असेल हे प्रश्न कोणी मांडले नव्हते. आता कुणीतरी जाणीवपूर्वक चिथावणी देण्याचे प्रकार करतेय. राज्य सरकार बघ्याची भूमिका घेतेय. या भागातील लोकांच्या ज्या समस्या असतील, आम्ही त्यांना भेटू. महाराष्ट्रातील खासदार आहेत त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानावर ही घटना घालावी, असे पवार म्हणाले.
दोन्ही राज्यांच्या प्रमुखांकडून अपेक्षाभंग"खरंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडूनच वादग्रस्त वक्तव्यांची सुरुवात झाली. पण त्यानंतरही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून वाद शमवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. तेही काही होताना दिसलेलं नाही. आता दिवसेंदिवस वाद चिघळत आहे. दोन्ही राज्यांच्या प्रमुखांकडून यावर चर्चा होऊन वाद शमवण्याची अपेक्षा होती. पण तसं काही होताना दिसत नाहीय. आता १९ डिसेंबरपासून कर्नाटकचं अधिवेशन होणार आहे. ही देखील पार्श्वभूमी आहे. बेळगावातील मराठी भाषकांवर दहशतीचं वातावरण तयार केलं जात आहे", असं शरद पवार म्हणाले.