मुंबई – मागील ५ महिन्यापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला शुक्रवारी गालबोट लागले. संतप्त एसटी कर्मचाऱ्यांपैकी काहींनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी धडक दिली. मुंबईतील सिल्व्हर ओक या पवारांच्या घरी आंदोलक मोठ्या संख्येने एकत्र गेले आणि घरावर चप्पला फेकण्यात आल्या. या आंदोलनात जवळपास १०५ जणांना पोलिसांनी अटक केली. संतप्त आंदोलकांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. आता त्यात राष्ट्रवादी आमदारानं धक्कादायक विधान केले आहे.
राष्ट्रवादी आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, शरद पवारांचा एसटी विषयाशी संबंध नसताना जाणीवपूर्वक हा हल्ला करण्यात आला. हल्ला करायचा होता तर मातोश्रीवर करायचा होता. मग हल्ल्याची किंमत काय समजलं असते. शरद पवारांवरच का? आतापर्यंत राज्यात जितके आंदोलन झाली. त्याचा शेवट बारामतीला व्हायची. राज्याचं परिवहन खातं अनिल परबांकडे(Anil Parab) आहे. जे काही करायचे होते ज्यांच्याकडे खाते आहे तिथे करायचं होतं. या विषयाशी पवारांचा संबंध नाही. मात्र जाणीवपूर्वक हल्ला करण्यामागे काहींचा विशेष हेतू आहे असा आरोप त्यांनी केला.
गुणरत्न सदावर्तेंना ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
‘सिल्व्हर ओक’ या बंगल्यावर हल्ला प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर, शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर किला न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांचा जामीन अर्ज फेटाळत दोन दिवसांची म्हणजेच ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अन्य १०९ जणांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
अशी घटना परत व्हायला नको – राज्यपाल
शरद पवार यांच्या घरावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी जो हल्ला केला त्या घटनेवर स्वत: मुख्यमंत्री लक्ष देत आहे. तसेच शरद पवार यांच्या घरावर जो हल्ला झाला ते तसा हल्ला भविष्यात होणार नाही याची सरकारन खबरदारी घेण्यात यावी. स्वतः शरद पवार हे प्रतिष्ठित व्यक्ती आहे ही घटना परत व्हायला नको याची काळजी घ्यायला हवी. यावर राज्य सरकार देखील पुढे लक्ष देईल असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी म्हटलं आहे.