देशावर एवढ्या राजसत्तांची आक्रमणे झाली, चंद्रगुप्त मौर्य सारख्यांची साम्राज्य उभी होती. परंतू तीनशे चारशे वर्षे झाली तरी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आजही घेतले जाते. जिजाऊंच्या नेतृत्वात शिवाजी महाराजांनी चोहुबाजुंनी सर्व मुघल साम्राज्यांशी लढले, समाजातील सर्व घटकांचा विचार केला. आज देशाला एकसंध ठेवण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर आली आहे. भाजपा जिथे जिथे सत्तेत आली तिथे तिथे अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
राष्ट्रवादीची आज कोल्हापुरात संकल्प सभा झाली, यावेळी पवार बोलत होते. शाहू महाराजांनी अनेक मोठमोठ्या लोकांशी वैर घेतले परंतू सामान्यांची सेवा कधी सोडली नाही. या कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांना हिमालयात पाठविण्याचा बंदोबस्त कोल्हापूरकरांनीच केला. कोल्हापूरचा निकाल लागला आणि माझी काळजी वाढली, कोल्हापुरच्या निकालाने देशात संदेश गेला, असे पवार म्हणाले.
देशाला दिशा देण्याचे काम बाबासाहेब आंबेडकरांनी केले. स्वातंत्र्यापूर्वीच्या सरकारमध्ये आंबेडकर हे वीज मंत्री होते, त्यांनी आपला देश पुढे नेण्यासाठी एक संकल्पना मांडली. विजेच्या ग्रीडची. ज्या राज्यांमध्ये जास्त वीज आहे, त्या राज्यांची वीज कमी वीज असलेल्या राज्यांना जोवर वळविली जात नाही, तोवर या राज्यांचा विकास होऊ शकत नाही. त्यांनी देशाला ग्रीडची भेट दिली, निर्णय घेतला, असे पवार म्हणाले.
दिल्लीत हिंसाचार झाला, गृहखाते अपयशी ठरले. दिल्लीत काही घडले की त्याचा संदेश जगात जातो. कालच्या घटनेने भारतात अस्थिर वातावरण आहे, हा संदेश गेला. काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांवर हल्ले केले. त्यांना देशात अन्य ठिकाणी जावे लागले. या सिनेमाचा हेतू हा होता, की तिथे सामाजिक वातावरण बिघडवायचे आणि त्यावरून तिथे मतांचा जोगवा मागायचा. अनेकांना माहिती नाहीय तिथे काय चालले आहे, अशी टीका पवार यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटावर केली.