नाशिक – रविवारी राज्याच्या राजकारणात भूकंप घडला. राष्ट्रवादीचे अजित पवारांसह ८ दिग्गज नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेत राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तर भुजबळ, वळसे-पाटील, मुंडे यांच्यासह इतरांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे आमदारही राजभवनात उपस्थित होते. नेमकं ही प्रक्रिया कशी घडली याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यावर अजित पवार समर्थक आमदार नितीन पवार यांनी घटनाक्रम सांगितला आहे.
आमदार नितीन पवार म्हणाले की, आम्हाला परवा संध्याकाळी फोन आला, मुंबईत बोलावण्यात आले होते. सकाळी घरगुती कार्यक्रमामुळे मला जाता आले नाही. संध्याकाळी मी अजित पवारांची भेट घेतली. आमदारांच्या ज्या पत्रावर सह्या घेतल्या त्या सगळ्या वाचून दाखवून सह्या घेतल्या. कुणालाही न लपवता सह्या घेतल्या असं काही जाणवलं नाही. आम्ही सर्व राष्ट्रवादीसोबत आहोत. मतदारसंघातील विकास करायचा असेल तर अजित पवारच करू शकतात. त्यामुळे मी अजितदादांसोबत आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच यात कुठलीही तांत्रिक अडचण येईल असं वाटत नाही. कारण दादांनी अभ्यास करूनच हा निर्णय घेतला आहे. अडीच वर्षाच्या काळात अजितदादांनी जो निधी आमदारांना दिला त्यामुळे बहुतांश आमदार अजित पवारांसोबत आहेत. नाशिक जिल्ह्यातील आम्ही ३ आमदार अजित पवारांकडेच गेलो होतो. नरहरी झिरवाळ हेदेखील होते. ५ तारखेच्या बैठकीला अजित पवारांनी जी बैठक बोलावली तिथे आम्ही सर्व जाणार आहोत असं आमदार नितीन पवार यांनी म्हटलं.
दरम्यान, पवार कुटुंबातील हा कौटुंबिक विषय आहे. मी त्यावर अधिक भाष्य करू शकत नाही. शरद पवार हे आमचे नेते आहेत. येणाऱ्या निवडणुकीत कुठलीही अडचण येणार नाही असा शब्द अजित पवारांनी आमदारांना दिल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी सांगितली.