पुण्यात झालेल्या भाजपाच्या महाअधिवेशनामध्ये उपस्थित नेते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावरून आज राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, शरद पवार यांना भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हणण्यावरून आमदार बच्चू कडू यांनी अमित शाह यांना टोला लगावला आहे. शरद पवार हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असतील तर अजित पवार हे कोण आहेत, असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला आहे.
अमित शाह यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, जर शरद पवार हे सरदार आहेत, तर मग अजित पवार कोण, असं लोकं विचारतील. सरदारांचे पुतणे आहेत की कोण आहेत, हे विचारलं जाईल. कदाचित अमित शाह हे विसरभोळे झाले असतील. ते बऱ्याचदा चुकीची विधानं करतात आणि मग ती अंगलट येतात, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, राजकारणात सत्ता महत्त्वाची झालेली आहे. मागच्या पाच वर्षांत भाजपाने सत्ता महत्त्वाची, मग ती कशीही मिळो, कुणीही भेटो, असं धोरण राबवलेलं आहे, अशा विचारामधून ते सगळं झालेलं आहे. शरद पवार हे काही कच्चे खेळाडू नाहीत. त्यामुळे ते भाजपामध्ये जातील, असं वाटत नाही, असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले. दरम्यान, भाजपाने मुख्यमंत्रिपदासाठी केलेल्या मोर्चेबांधणीबाबत बच्चू कडू म्हणाले की, आम्ही जर तरवर विश्वास ठेवत नाही. दूध का दूध, पानी का पानी हे मतदार ऑक्टोबर महिन्यात दाखवून देतील. दिवाळीचा खरा गोड पदार्थ कुणाच्या तोंडी लागेल, हे आज सांगण्यात काही अर्थ नाही असेही बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले.