- मोसीन शेख
मुंबई : विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तीन आठवड्यांचा कालावधी उलटला तरी राज्यात सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बैठक झाली होती. त्यांनतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पवारांची भेट झाली. त्यामुळे राज्यातला तिढा दिल्लीत सुटणार असल्याच्या चर्चेला वेग आला आहे. मात्र महाराष्ट्रप्रमाणे दिल्लीत सुद्धा या सर्व घडामोडींमध्ये शरद पवार हेच केंद्रस्थानी असल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेना पक्षाचे युती सरकार राज्यात पुन्हा स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्चितच समजले जात होते. मात्र मुख्यमंत्रीपदावर दावा केला जात असल्याने या दोन्ही पक्षामध्ये वादाची ठिणगी पडली. पुढे या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर दबावतंत्राचा वापर करताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांच्या पर्यायाची भीती दाखवली जात होती. त्यामुळे सत्तास्थापनेतही पवार फॅक्टरचं महत्वाचा ठरत असल्याची चर्चा पाहायला मिळत होती.
त्यांनतर काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात एकत्र येण्यासाठी हालचाली सुरु असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र शिवसेनेसोबत जाण्यासाठी काँग्रेसचे पक्षश्रेष्ठींचा ग्रीन सिग्नल खूप महत्वाचा होता. त्यामुळे पुन्हा दिल्लीतील ही जवाबदारी पवारांवरचं आली. कारण काँग्रेसच्या हायकमांड यांची मनधरणी करणे एवढे सोपे नव्हते आणि ते राज्यातील काँग्रेस नेत्यांना शक्य ही नव्हते.
याच पार्श्वभूमीवर पवारांनी मंगळवारी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली.परंतु राज्यातील सत्तास्थापनेबाबत सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पवार भाजप सोबत जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यातच पवारांनी आज मोदींची भेट घेतली. तर पवारांच्या या भूमिकेवरून विरोधीपक्षांसह मित्रपक्ष सुद्धा बुचकळ्यात पडले आहे. त्यामुळे सत्तेस्थापनेच्या राजकीय घडामोडी पाहता महाराष्ट्रातच नव्हे दिल्लीत सुद्धा पवारांची 'पावर' पाहायला मिळत असल्याचे बोलले जात आहे.