'घालीन लोटांगण, वंदीन बिहार...'; अमोल कोल्हेंकडून केंद्रीय अर्थसंकल्पाची विडंबनपर 'आरती'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 02:39 PM2024-07-23T14:39:24+5:302024-07-23T14:43:46+5:30
Amol Kolhe on Union Budget: महाराष्ट्र किंवा मुंबईबाबत अर्थसंकल्पाच्या भाषणात उल्लेख ने केल्याने विरोधक आक्रमक
Amol Kolhe on Union Budget: पंतप्रधान मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. यामध्ये विद्यार्थी वर्ग, तरुण, शेतकरी, महिला, स्टार्टअप यांसाठी अनेकविध योजना घोषित केल्या. तसेच काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. कररचनेत बदल करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, बिहार तसेच ओडिशा राज्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. पण महाराष्ट्र किंवा मुंबईबाबत अर्थसंकल्पाच्या भाषणात उल्लेखही करण्यात आला नाही. त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी चार ओळींची विडंबनपर आरती लिहिली.
निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील सरकारला काहीही योजना मिळालेल्या नाही असे कोल्हे यांचे रोखठोक मत आहे. बिहार आणि आंध्र प्रदेश म्हणजेच नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोन नेत्यांच्या राज्यांना यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक फायदा देण्यात आला आहे असे सूचक विधान कोल्हे यांनी केले.
घालीन लोटांगण वंदीन बिहार,
डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे,
दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र,
सरकार वाचवेन म्हणे नमो!!
अशी विडंबनपर आरती लिहून अमोल कोल्हे यांनी आजच्या अर्थसंकल्पाचा सारांश मांडला.
आजच्या अर्थसंकल्पाचा सारांश :
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 23, 2024
घालीन लोटांगण वंदीन बिहार,
डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे,
दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र,
सरकार वाचवेन म्हणे नमो !!#UnionBudget2024#BudgetSession#BudgetSession2024#UnionBudget24#Maharashtra#BiharSpecialStatus#AndhraPradesh…
ठाकरे गटाकडूनही अर्थसंकल्पावर टीकास्त्र
"या अर्थसंकल्पाला 'पंतप्रधान सरकार बचाव योजना' म्हणायला हवे. कारण त्यांना हे लक्षात आले आहे की, पुढील ५ वर्षांसाठी हे सरकार वाचवायचे असेल तर त्यांच्या मित्रपक्षांना आनंदी ठेवण्याची गरज आहे. बिहार आणि आंध्र प्रदेशला विशेष दर्जा नाकारल्यानंतर केंद्र सरकारने त्यांना निधी दिला. केंद्राकडून महाराष्ट्राकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातून पैसा हवा आहे. परंतु, महाराष्ट्रातील विकास, योजना यांसाठी काही नाही," अशी टीका ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली.