NCP supports Uddhav Thackeray in Andheri Elections: शिवसेना कोणाची हा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय ठरताना दिसतोय. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या दिवसापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघेही त्यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहेत. काल पार पडलेल्या दसरा मेळाव्यात दोन्ही गटांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यानंतर आता अंधेरीची पोटनिवडणूक अधिक रंगतदार होणार याबाबत दुमत नाही. या पोटनिवडणुकीत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीर पाठिंबा असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी तशा सूचना दिल्या आहेत, अशी जाहीर घोषणा राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. तसेच, काँग्रेससह राष्ट्रवादीनेही पाठिंबा जाहीर केल्याने शिवसेनेची ही जागा प्रचंड मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वासही महेश तपासे यांनी व्यक्त केला.
"स्वतःला शिवसेना म्हणवून घेणार्यांना या निवडणुकीत भाजपने साधं विचारलंही नाही आणि भाजपाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेना म्हणून शिंदे गटाला जवळ केले असेल तर ती जागा सोडायला हवी होती. मात्र तसे न करता भाजपने शिंदे गटाला डावलून भाजपची उमेदवारी जाहीर केली आहे. यातून भाजपची काय रणनीती आहे हे सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे शिवसेनेची ही जागा दणदणीत मतांनी निवडून आणू," असा टोलादेखील राष्ट्रवादीकडून लगावण्यात आला.
"२०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हापासूनच आमचे व कॉंग्रेसचे समर्थन हे उध्दव ठाकरे यांना आहे. उत्कृष्ट कामगिरी झाली म्हणूनच देशाच्या पाच टॉप मुख्यमंत्र्यांमध्ये उध्दव ठाकरे यांचे नाव आले. आता जो शिंदे गट तयार झाला आहे तो राजकीय षडयंत्राचा भाग होता. त्यामुळे खरी शिवसेना ही बाळासाहेबांच्या आणि उध्दव ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आहे. अशा पक्षासोबत राष्ट्रवादी आहे. देशातील सर्व पक्षांची मोट बांधून मोदी सरकारच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी शरद पवार हे आग्रही होते आणि आजही आहेत. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे महाराष्ट्रात येत आहेत तर त्यांचे स्वागत आहे. जे जे लोकं भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत त्यांना नक्कीच समर्थन असणार आहे. ज्यांची भाजपच्या मनुवादी विचारांच्या विरोधात भूमिका आहे त्यांना राष्ट्रवादी नक्की बळ देईल," असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचाही शिवसेनेला पाठिंबा- नाना पटोले
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. या निवडणुकीत काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली.
निवडणूक कधी? उमेदवार कोण?
शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार असून ६ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी अद्याप तरी कोणीच आपला उमेदवार जाहीर केलेला नाही, पण शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर भाजपाकडून मुरजी पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.