Jitendra Awhad on Mahayuti Govt: लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार यश मिळवले. त्यानंतर काल विधान परिषदेची निवडणूक पार पडली. त्यात महायुतीने बाजी मारली. राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी हा सामना सुरुच आहे. त्याचप्रमाणे दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही सुरुच आहेत. या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. "महाराष्ट्रावरील कर्ज दुप्पटीने वाढत आहे असा अहवाल भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी (कॅग) दिला आहे. त्यामुळे राज्यातील महायुती सरकार हे वास्तववादी भान हरवलेलं सरकार आहे," अशी खरमरीत टीका कॅगच्या अहवालावर बोलताना आव्हाड यांनी केली.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, "महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे तिजोरीवर भार वाढत असल्याचे निरीक्षण सुद्धा नोंदवलं आहे. २०२२-२३ या वर्षाच्या महाराष्ट्र राज्य वित्त लेखापरीक्षण अहवालाने राज्य सरकारला वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्याची शिफारस केली आहे. मुळात राज्यातील महायुतीचे हे ट्रिपल इंजिन सरकार वास्तववादी भान हरवलेलं सरकार आहे."
"राज्य सरकारकडून राज्यातील विविध संस्थांना ५०००० कोटीचा निधी दिला आहे. ५० हजार कोटी कुठे आणि कसे दिले. हे जर कॅगला कळत नसेल तर मग सर्वसामान्य मराठी माणसाला यामध्ये काय कळणार आहे. त्याच्या तिजोरीतील ५० हजार कोटी मंडळाने आणलेले नव्हते ते महाराष्ट्रातील गोरगरीब, कष्टकरी माणसाच्या खिशातून गेलेले आहे. कॅगने या संदर्भातील राज्य सरकारवर केलेले ताशेरे हे गंभीर आहे महाराष्ट्रात ६४ वर्षात आजपर्यंत असे ताशेरे कॅगने कधीही ओढलेले नाही आहे. कॅगने महायुती सरकारवर आज जसे गंभीर ताशेरे ओढले आहे तसे आजपर्यंत कधी कॅगने ओढलेले नाही आहे," असेही जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केले.