Ajit Pawar, Budget Session of the Maharashtra: अर्थसंकल्पीय अधिवेशन पाच आठवडे घ्या; अजित पवार यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 11:46 AM2023-02-08T11:46:14+5:302023-02-08T11:47:02+5:30
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सव सर्वपक्षीयांच्या सहभागातून भव्य प्रमाणात साजरा करण्याचीही मागणी
Ajit Pawar, Budget Session of the Maharashtra: नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी असतानाही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष भव्य प्रमाणात साजरे व्हावे, अशी महाराष्ट्रवासियांची भावना आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात ५०० कोटींची घोषणा केली होती. मराठवाडा, महाराष्ट्रातील नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात यावे, मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे असेही अजित पवार म्हणाले.
यावेळी विधीमंडळ सदस्यांनी सभागृहात विविध आयुधांव्दारे उपस्थित केलेल्या प्रश्नांची योग्य, मुद्देसूद लेखी उत्तरे देण्यात यावीत, आदी मागण्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केल्या.