Chhagan Bhujbal: महाराष्ट्रात सर्वाधिक बेरोजगारांची आत्महत्या झाली आहे. राज्यातील तरुणांना रोजगाराचा प्रश्न अतिशय गंभीर असून उद्योग वाढविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी मागणी करत राज्यपालांच्या अभिभाषणात राज्यात उद्योगातील गुंतवणूक, रोजगार यासह अनेक महत्वाच्या योजनांबाबत कुठलीही स्पष्टता दिसत नाही, असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना व्यक्त केले. त्याचवेळी मराठी राजभाषा दिनी राज्यपालांचे अभिभाषण झाले. राज्यपाल अभिभाषण करताना किमान काही ओळी तरी मराठीत बोलणे अपेक्षित होते. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषा दिनाच्या दिवशीच बेळगाव येथील सभेत तिथे कन्नड भाषेतून आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्या बेळगावात आजदेखील मराठी भाषिक जास्त आहे. याकडे छगन भुजबळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
अर्थव्यवस्था कोरोनानंतर पुनर्जीवित करण्यासाठी युवकांना नोकऱ्या देणे हे माझ्या सरकारची पहिली प्राथमिकता आहे पण, कोविडची लाट कमी होताच मुख्यमंत्री आरोग्य कौशल्य योजना बंद पडली. १९ हजार जणांनी प्रशिक्षण घेतले. मात्र नोकऱ्या फक्त ४ हजार जणांनाच देण्यात मिळाल्या. राज्यात ७५ हजार नोकरभरती होत आहे. मात्र ग्रामविकास विभागाची भरती कधी सुरु होणार, आरोग्य विभागाची भरती कधी होणार असा सवाल उपस्थित करत ग्रामविकासच्या १३ हजार पदभरतीचा घोळ अजुनही सुरु असल्याची बाब छगन भुजबळ यांनी निदर्शनास आणून दिली.
निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान अशा जाहिराती शासन करतेय मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आपण वेळेवर करत नाही. एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून नियमित करण्याची मागणी आत्ताच्या सरकारमधील मंडळींनी केली होती. मग ते निर्णय का घेत नाही असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
राज्यात प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत ४ लाख ८५ हजार युवकांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या आयोजित केले. पण त्यांना नोकऱ्या देणार कोण, नोकरीच्या शोधात असलेल्या ५६ लाख ४० हजार तरुणांनी राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता, विभागाकडे नोंदणी केली मात्र त्यातल्या फक्त ३.८८ टक्के तरुणांना रोजगार संबंधित खात्याने दिल्या इतर तरुणांचे काय असा सवाल उपस्थित करत या योजनांचा ५४ कोटी रुपये निधी शिल्लक असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे. नॅशनल क्राईम रॅकॉर्ड ब्युरोने दिलेल्या आकडेवारीनुसार बेरोजगारीमुळे सर्वात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रात होत आहेत. बेरोजगारीला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करत कारखाने वाढविले पाहिजे. बाहेर जाणारे कारखाने थांबविले पाहिजे. अद्यापही गुजरातमध्ये फॉक्सकॉन सुरु होऊ शकला नाही तो पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे असेही छगन भुजबळ म्हणाले.