Nanded Patients Death Case: ‘हाफकिन’च्या औषध खरेदी गोंधळानंतर राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अत्यवस्थ रुग्णांनाही वेळेत औषधी न मिळत नसल्याच्या घटना घडत आहेत. काहींना वेळेत औषध न मिळाल्याने जीव गमवावा लागण्याचीही वेळ येत आहे. अशा परिस्थितीत काहीसा धक्कादायक प्रकार नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडला. गेल्या २४ तासांत रुग्णालयात तब्बल २४ रुग्णांचा मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये १२ नवजात बालकांचाही समावेश आहे. त्यामुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर सडकून टीका केली.
जयंत पाटील यांनी ट्विट करून सरकारवरील रोष व्यक्त केला. "नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात चोवीस तासात तब्बल २४ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. त्यात १२ नवजात बालकांचा समावेश आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी प्रकारानंतर नांदेडहून येणारी बातमी वेदनादायी आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला. रुग्णांना वेळेवर औषधे पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. जितकी कार्यक्षमता स्वतःच्या प्रचारासाठी, विरोधी पक्ष फोडण्यासाठी वापरता, तितकी कार्यक्षमता जर कामाप्रती दाखवली असती तर ही परिस्थिती आली नसती," अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे मारले.
तसेच, सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे आज अनेक आयांनी आपली लेकरे गमावली आहेत. त्यांच्या अश्रूंची किंमत सरकारला मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.