Jayant Patil reaction on MVA CM Post: महाविकास आघाडी २०१९ पासून २०२२ च्या मध्यापर्यंत सत्तेत होती. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतच वेगळा गट तयार केला आणि मविआचे सरकार कोसळले. पण आता पुन्हा एकदा मविआचे सरकार येणार असे दावे केले जात आहेत. त्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल यावरही भाष्य केले जात आहे. याचसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक सूचक विधान केले आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात मविआचे पुन्हा सरकार आले तर मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल असा सवाल त्यांना विचारला गेला त्यावर ते म्हणाले- आघाडीमध्ये जास्त संख्या त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र साधारण असते. जयंत पाटील यांच्या या उत्तराने त्यांना नक्की काय सुचवायचे आहे ते साऱ्यांनाच समजले अशी चर्चा आहे. "आम्ही आघाडीत असलो तरी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाचा असतो. त्या अनुषंगाने काही विधाने झालेली असतील. आघाडीमध्ये जास्त संख्या त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र साधारण असते. पण महाविकास आघाडी प्रयत्नांची शिकस्त करुन जास्तीत जास्त उमेदवार जिंकून आणण्याचा प्रयत्न आहे," असेही जयंत पाटील म्हणाले.
महाविकास आघाडी एकसंघ राहिल्यामुळे महाराष्ट्रात भाजपाची ताकद किती कमी आहे हे पुन्हा एकदा बाजार समितींच्या निवडणूकीतून महाराष्ट्रासमोर आले आहे. आणि एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊन गेले तरी त्यांना म्हणावे इतके यश मिळाले नाही याचा परिणाम हा भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्रित आले तरी महाराष्ट्रात त्यांचे सरकार येणार नाही हे चित्र तयार करणारे आहे अशी प्रतिक्रियाही जयंत पाटलांनी दिली.
सरकारने अवकाळी पावसात अडकलेल्यांना दिलासा दिला नाही. आता हवामान खात्याने उद्यापासून पाऊस हजेरी लावणार आहे. त्यासाठी राज्य सरकार सज्ज झालेले दिसत नाही. जो शेतकरी संकटात आहे त्याच्याच नशीबी अवकाळी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी सावरण्यासाठी सरकारने काही केलेच नाही. किमान पाऊस येणार हे माहीत असताना राज्यातील महसूल यंत्रणा, पोलीस, आरोग्य यंत्रणा सतर्क सरकारने ठेवली पाहिजे. त्यासाठी तातडीने बैठका घेतल्या पाहिजेत अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.