Jayant Patil warning Shinde Fadnavis Govt: राज्यात सध्या विविध विषय चर्चेत आहेत. राज्याच्या राजकारणातील अनेक अध्याय नव्याने उलगडताना दिसत आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात राज्याच्या राजकारणात झालेल्या भूकंपाचे हादरे अजूनही महाविकास आघाडीला मध्ये-मध्ये बसताना दिसत आहेत. या साऱ्या राजकीय चर्चांमुळे राज्यातील मूळ विषय, मुलभूत समस्या यांच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मविआ आघाडीकडून केला जात आहे. तशातच आता एका नव्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे.
MPSC अभ्यासक्रमात अचानक होणारा बदल हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. सरकारने याची नोंद घ्यावी आणि बेरोजगारीने बेजार झालेल्या तरुणांच्या पदरी पुन्हा निराशा टाकण्याचे पाप सरकारने करू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. MPSC परीक्षेसाठीचा नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थी आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची जयंत पाटील यांनी सोमवारी भेट घेतली. "हा विषय अतिशय गंभीर असून दिवसरात्र अभ्यास करून मुले परीक्षेची तयारी करत आहेत. अचानक अभ्यासक्रमात होणारा बदल हा त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे", असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.
दरम्यान, पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच आहे. आंदोलन स्थळावरील स्ट्रीट लाईट काल बंद करण्यात आले होते. त्यावेळी आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च लावत आंदोलन सुरूच ठेवल्याचे पाहायला मिळाले. नवी परीक्षा पद्धती २०२५ पासून लागू करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी MPSC चे विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. सोमवारी पुण्यातल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात अंधारातही देखील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच होते. गेल्या दोन महिन्यातील हे तिसरे आंदोलन आहे. जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत सरकारने नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. मात्र हा निर्णय घेऊन तीन आठवडे उलटले असूनही या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.