भारताच्या इतिहासात गुरूवारी एक अतिशय मोठी घटना घडली. आदिवासी घटकातील महिला द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती म्हणून विराजमान होण्याचा मान मिळवला. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार असलेले यशवंत सिन्हा यांना पराभूत केले. द्रौपदी मुर्मू यांना ८१२ तर यशवंत सिन्हा यांना ५२१ मते मिळाली. मुर्म यांच्या विजयाची घोषणा झाल्यावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुर्मू यांच्या विरोधी पक्षात असला तरी त्यांच्याकडूनही मुर्मू यांचे अभिनंदन करण्यात आले. या शुभेच्छांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसनेभाजपाला कोपरखळी मारली.
काल झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये 'एनडीए'च्या उमेदवार श्रीमती द्रोपदी मुर्मु या निवडून आल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भारतीय लोकशाही व संविधानाच्या रक्षणाचे कर्तव्य राष्ट्रपती भवनातून त्या निश्चितच योग्य रित्या पार पाडतील अशी अपेक्षा आहे. पण महाराष्ट्रातील काही भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रपती निवडीदरम्यान राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे आमदार क्रॉस वोटिंग करतील असे जाहीर केले होते. निवडणुकीचा निकाल पाहता व पडलेल्या मतदानाची पाहणी केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच भारतीय काँग्रेस पक्षाचे मतदान एकसंघ राहिलं आणि भाजपचा डाव फसल्याने ते नेते तोंडघाशी पडले", अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मारली.
"२०१९ पासूनच भाजपाचे नेतृत्व आमचे नेते आणि कार्यकर्ते फोडण्याचे कटकारस्थान करत आहेत. सत्तेवर आलेलं शिंदे फडणवीस सरकार हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. राष्ट्रवादी पक्षाची बांधिलकी भारतीय राज्य घटनेशी व कल्याणकारी राज्य या संकल्पनेशी आहे. म्हणूनच आम्ही भाजपच्या मनुवादी व फॅसिस्ट विचारांचा मुकाबला करतच राहणार", असं रोखठोक मतही तपासे यांनी मांडलं.