Jayant Patil NCP: महाराष्ट्रात जूनच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अभूतपूर्व अशी गोष्ट घडली. शिवसेनेचे वरच्या फळीतील नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांच्या साथीने बंडखोरी केली. त्यानंतर त्यांना शिवसेनेच्या एकूण ५० आमदारांची साथ मिळाल्याने, महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. सध्या प्रत्येक पक्षाच्या सुरू असलेल्या विविध हालचाली या सत्तास्थापनेच्याच आहेत. पण याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे. सत्तेपेक्षाही लोकशाही टिकवणे जास्त महत्त्वाचे असल्याची पक्षाची भूमिका त्यांनी मांडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलची राज्यस्तरीय बैठक आज राष्ट्रवादी भवन मुंबई येथे पार पडली. यावेळी डॉ. सुनील जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा डॉक्टर सेल गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. अनेक नवनवीन उपक्रम राबवून मावळते प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी ही संघटना वाढवली. आता डॉ. सुनील जगतापही त्याच जोमाने काम करतील असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. याच कार्यक्रमात जयंत पाटीला म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लढा हा सरकार स्थापन करण्यासाठी नसून फुले- शाहू-आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी आहे. डॉक्टर, वकील हे शिक्षित वर्ग लोकांचे मत परिवर्तन करू शकतात. मधल्या काळात आपल्या डॉक्टर सेलने अतिशय चांगली कामगिरी केली, महापूर असो की कोविड, डॉक्टर सेल सेवा करण्यात सर्वात पुढे होता. डॉक्टर सेलने मोफत शिबिरे घेऊन सामान्य लोकांना मदत केली. त्यामुळे सत्तास्थापना हाच पक्षाचा उद्देश नसून लोकशाही मूल्ये टिकवणे हा मूळ हेतु आहे."
डॉक्टर सेलच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका लोकांना पटवून द्यावी. हे करण्यासाठी आपल्याला उत्स्फूर्तपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच तयार करायला हवा. जास्तीत जास्त डॉक्टर आपल्या संघटनेशी कसा जोडता येईल याची काळजी घ्यावी, असा सल्ला यावेळी जयंत पाटील यांनी दिला.