Sharad Pawar NCP Deepak Kesarkar: शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेच्या बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केला. शिंदे गटाने बंडखोरी केल्यापासून दीपक केसरकर या गटाचे प्रवक्ते पद सांभाळत आहेत. याच नात्याने आज त्यांनी प्रतिक्रिया देताना केलेल्या दाव्यामुळे खळबळ माजली. शिवसेनेतून नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे यांना बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली असा दावा दीपक केसरकरांनी केला. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उत्तर देण्यात आले आहे.
"बेकायदेशीर शिंदे सरकारचे बेकायदेशीर प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शरद पवारांबद्दल केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. बेकायदेशीर शिंदे सरकारचे बेकायदेशीर प्रवक्ते काहीही बोलतात. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर लोटांगण घालणाऱ्या बंडखोर आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वेदना देण्याची खरी कृती केली आहे", अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दीपक केसरकर यांना शरद पवारांवर केलेल्या आरोपवर प्रत्युत्तर दिले.
"शरद पवारांनी बाळासाहेबांचा स्वाभिमान आणि मैत्री जपण्याचे काम केले. शिवसेनेचा इतिहास किंवा जे लोक बाहेर पडले त्याची कारणे दिपक केसरकर यांना माहीत नसावीत. पण बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत होती. जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला झिडकारले त्यावेळी शरद पवारांनी शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षाची मोट बांधून महाविकास आघाडी तयार केली व शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले हे दिपक केसरकर सोयीस्करपणे विसरले आहेत", अशा शब्दांत त्यांनी केसरकरांना सुनावले.