Chhagan Bhujbal on OBC Reservation: "ओबीसी इम्पिरिकल डाटाबाबत वर्तमानपत्रात जे रिपोर्ट आले आहेत ते थोडे धक्कादायक आहेत. आडनावावर जाऊन घरात बसून कोण माहिती घेत असेल तर हे चुकीचे आकडे येतील आणि हे चुकीचे आकडे केवळ या आरक्षणासाठी नाही तर सर्वप्रकारच्या पुढच्या आरक्षणासाठी हा ओबीसींवर फार मोठा अडचणीचा विषय ठरेल", अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबार उपक्रमास छगन भुजबळ उपस्थित होते त्यावेळी माध्यमांशी संवाद साधला.
"डाटाबाबत गांभीर्याने विचार करून प्रयत्न केला त्यावेळी वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. सॉफ्टवेअर कंपन्यांकडून आऊटसोर्सिंगचे जे काम करण्यात आले, त्याप्रमाणे त्या सॉफ्टवेअर कंपन्यांना ज्या सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे त्या कंपन्या काम करत आहेत. कुणी तशा सूचना दिल्या असतील की ही नावे या समाजाची, ती नावे या समाजाची वगळा.. तर हे चुकीचे आहे", असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
"प्रत्येक वेळी सिद्ध झाले आहे की ओबीसी समाज ५४ टक्के आहे. पवारसाहेबांनी मंडल आयोग दिला, त्या वेळेपासून आहे. पण त्यानंतर २००४ पासून कुणबी मराठा, मराठा कुणबी हे सुद्धा ओबीसीत आले आहेत. त्यावेळी अडीचशे जाती होत्या. आता सव्वाचारशे जाती झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात ओबीसीमधील जाती कमी होण्याचा संबंध येत नाही, उलट वाढतील. कारण मराठा समाजात अर्धे कुणबी समाजाचे आहेत. मग प्रश्न असा येतो की आकडे कमी कसे येतात", अशी चिंता भुजबळ यांनी व्यक्त केली.
"ओबीसी आरक्षणाचा उपयोग पुढे शिक्षण व नोकरी आरक्षणावर याचा फार मोठा परिणाम होणार आहे. त्यासाठी याचं योग्य परीक्षण झालं पाहिजे. योग्य रितीने डाटा निर्माण झाला पाहिजे, अशी सर्वांची मागणी आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही पत्र दिले आहे" अशी माहितीही त्यांनी दिली.