NCP Fauzia Khan, Bhagat Singh Koshyari: राज्याच्या राजकारणात सध्या अनेक विषयावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. सुरूवातीला राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. त्यांच्याबद्दल बोलताना सत्तारांनी एका आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला. त्यामुळे चांगलाच वादंग निर्माण झाला. तो विषय शमण्याआधीच, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानाने नवा वाद उफाळून आला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एका विधानामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली. केवळ राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गट यांनीच नव्हे तर शिंदे गट आणि भाजपाच्या नेतेमंडळींनीही राज्यपालांच्या विधानाबाबत उघड-उघड नाराजी व्यक्त केली. असे असतानाच, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी मात्र एक ट्विट करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आभार मानले. जाणून घेऊया नक्की प्रकरण काय आहे.
राज्यपालांचे का मानले आभार?
५० खोके घेऊन प्रत्येक आमदाराने आपले खिसे भरले आणि त्यातूनच नवे सरकार अस्तित्वात आले, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे यांनीही या संदर्भात विधान केले होते. त्यावर उत्तर देताना राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी एक विधान केले. रागाच्या भरात त्यांनी एक आक्षेपार्ह शब्द वापरला. त्यावरून अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. राज्यातील सर्वच नेत्यांनी शब्द जबाबादारीने वापरावेत, महिलांबद्दल बोलताना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे भान राखले पाहिजे, अशा आशयाचे पत्र आज राष्ट्रवादीकडून देण्यात आले. याच संदर्भात खासदार फौजिया खान यांनी राज्यपालांचे आभार मानले.
"महाराष्ट्र राज्य सरकारमधील जबाबदार पदावर कार्यरत असणाऱ्या मंत्र्यांनी महिलांबाबत अपमानास्पद विधाने केली. याच्या निषेधार्ह सर्व पक्षीय महिला आमदार, खासदारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदन दिले होते. याची दखल राज्यपालांनी घेतली असून या संदर्भातील निवेदन उचित कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेले आहे. याबद्दल राज्यपाल महोदयांचे आभार," असे ट्विट फौजिया खान यांनी केले.