NCP vs Eknath Shinde: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष रोज राज्यातील जनतेला नवनवीन मुद्दे चर्चेला देत असतो. जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विचारांशी घेतलेली फारकत ऐतिहासिक ठरली. त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिवसेनेतील शिंदे गट आणि भाजपा यांनी एकत्रित येत राज्यात सरकार स्थापन केले. तेव्हापासून एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार विरूद्ध विरोधक असा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. त्यातच, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला लवकरच ग्रहण लागणार आहे, अशी भविष्यवाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. याशिवाय, शिंदे गटातील अनेक आमदार आगामी विधानसभा निवडणूक भाजपाच्या कमळ चिन्हावर लढवतील, असा दावाही त्यांनी केला आहे.
राज्य सरकारला लवकरच लागणार ग्रहण!
महाराष्ट्राच्या शिंदे सरकारला लवकरच ग्रहण लागणार आहे. शिंदे गटातील आमदारांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्याकडून चूक झाली अशी त्यांची भावना होत चालली आहे. शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची स्वप्ने दाखवली गेली, पण ती पूर्ण झाली नाहीत. आपला डाव फसला अशा प्रकारची कबुली शिंदे गटातील आमदार मंडळी दबक्या आवाजात आपल्या मतदारसंघात देत आहेत," अशा शब्दांत राष्ट्रवादीचे महेश तपासे यांनी शिंदे सरकारमधील 'बाळासाहेबांची शिवसेना' गटाच्या आमदारांना टोला लगावला.
"आगामी २०२४च्या निवडणुकीत शिंदे गटातील अनेक आमदार भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवतील अशी चर्चा त्या-त्या मतदारसंघात सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तांतराचा डाव फसला आहे. ज्या पद्धतीने शिंदे सरकारने महाराष्ट्रात सत्ता काबीज केली, निश्चितच तो प्रकार महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला नाही. त्यामुळेच शिंदे गटातील आमदार आपली साथ सोडून भाजपासोबत जातील की काय, अशी चिंता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सतावते आहे", असा दावाही महेश तपासेंनी केला.
शिंदे गटाचे ५० आमदार भाजपाच्या संपर्कात!
एकनाथ शिंदे गटाचे २२ आमदार नाराज असून ते भाजपात विलीन होतील. ते भाजपाच्या संपर्कात आहेत असा दावा उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. या दाव्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी शिंदे गटाचे २२ नव्हे तर ५० आमदार हे भाजपाच्या संपर्कात आहेत. भाजपासोबत आमची मैत्री घट्ट आहे. त्यामुळे ठाकरे गटाला त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दात खोचक टीका केली. तसेच, ठाकरेंकडे शिल्लक राहिलेले आमदार सांभाळण्यासाठीच हे वक्तव्य केले जात आहे, असा टोला मंत्री गुलाबराव पाटलांनी लगावला.